कोयना धरणाजवळ निसर्गातल्या एका रहस्याचा शोध घेतला जातोय. पण एकाचा शोध घेताना भलतीच गोष्ट हाती लागावी.. अशा प्रमाणे दुसरंच रहस्य उलगडलं. ध्यानी मनी नसताना अचानक समोर येऊन उभं राहावं, अगदी तस्सं! महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या प्रत्येकाला ते माहीत असायलाच पाहिजे… पण खरंच किती जणांना त्याची कल्पना आहे??
– अभिजित घोरपडे
कोयनेचा भूकंप… हा सर्वांच्याच कुतुहलाचा विषय. ज्याला त्यातलं कळतं तो त्याच्याबद्दल बोलतोच, पण ज्याला काही कळत नाही तोसुद्धा इकडचं–तिकडचं ऐकून मतं मांडतो, तीसुद्धा ठासून ! या विषयाने काहींना प्रसिद्धी मिळवून दिली, तर काहींना त्याच्या अभ्यासासाठी बराच पैसा दिला.. याच भूकंपामुळे काहींची करियरसुद्धा घडली.
पण एवढं करून काय?… गमतीचा भाग असा की, मूळ प्रश्न अजूनही कायम आहे.
प्रश्न कोणता?… तर कोयना धरणाच्या विस्तृत जलाशयामुळे भूकंप होतात का किंवा भूकंप होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते का?
११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना धरणाजवळ आतापर्यंतचा सर्वांत मोठा भूकंप झाला. त्याला आता ४६ वर्षे उलटून गेली, तरीही त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं नेमकेपणाने मिळालेली नाहीत. कदाचित आणखी काही दशकं ती मिळणारही नाहीत..
या प्रश्नाची चर्चा नंतर करूच, पण आधी थोडं या गोंधळातून बाहेर आलेल्या रहस्याबद्दल!
हैदराबादला एक महत्त्वाची संस्था आहे– एन.जी.आर.आय. तिचं संपूर्ण नाव, नॅशनल जीओफिजिकल रीसर्च इन्स्टिट्यूट अर्थात राष्ट्रीय भूभौतिकी संशोधन संस्था! या संस्थेनं सतत एक धोशा लावलाय, तो म्हणजे– कोयनेतील भूकंपांचा धरणाच्या पाणीसाठ्याशी संबंध आहे. याच दृष्टिने त्यांनी संशोधन केलं. ते संशोधन वैज्ञानिक समुदायापुढं मांडलं. त्यावर टीका–टिप्पणी झाली. तरीही ही संस्थेनं हा मुद्दा सातत्यानं लावून धरला आहे. त्याला आता फळ आलंय. खुद्द केंद्र सरकारनं त्यात लक्ष घालून अभ्यासासाठी निधी उपलब्ध करून दिलाय. आतापर्यंत ४५० कोटी रुपये मंजूर झालेत.. पुढे आणखीही होतील. तिथले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. हे डॉ. राव नुकतेच पुण्यात आलेले असताना त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि या प्रकल्पाची सविस्तर माहिती झाली.
विषय तोच– कोयना धरणाच्या जलाशयाचा भूकंपाशी संबंध आहे का..? पण त्यासाठीचा अभ्यास वरवरचा नसेल. प्रत्यक्ष भूगर्भात जाऊन निरीक्षणं घेतली जाणार आहेत. सुरुवातीला कोयना धरणाच्या चहूबाजूंनी, दहा ठिकाणी “ड्रिल” मारली जात आहेत. काही झालीत, उरलेली पुढच्या काही महिन्यांत पूर्ण होतील. त्यांची खोली असेल, साधारणत: १५०० मीटर म्हणजे दीड किलोमीटर. ही “ड्रिल” घेतल्यावर तितक्या खाली भूकंपमापक आणि जमिनीत होणाऱ्या हालचाली टिपणारी यंत्रणा ठेवली जाणार आहे. त्याद्वारे अनेक नवनव्या गोष्टी माहीत होतील, त्यामुळे कोयना धरणाचा भूकंपाशी संबंध आहे का, याच्या उत्तराजवळ पोहोचता येईल.
ही “ड्रिल” खणल्यावर त्यातून जे काही बाहेर आलंय.. ते भूकंप अभ्यासाच्या मूळ उद्देशापेक्षाही रंजक आहे. त्याच्यामुळे तब्बल पाच–सहा कोटी वर्षांपूर्वीपासून जे झाकलेलं आहे, त्याच्यावरचा पडदा पहिल्यांदाच दूर झाला. आणि खाली दडलेलं रहस्य अलगद बाहेर आलं.
काय आहे हे रहस्य?… आपण ज्या खडकावर राहतो, तो आहे काळा पाषाण अर्थात बेसॉल्ट! ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस थंड झाल्यामुळे त्याची निर्मिती झाली. पण हा काळा पाषाण तयार झाला, त्याच्या आधीसुद्धा आपल्या भूमीत खडक होतेच की. ते कोणते असावेत, याबाबत बरेच अंदाज बांधले जात होते. पण प्रत्यक्षात खाली काय आहे, याचा उलगडा अद्याप झाला नव्हता. कारण आपल्या खडकाची जाडी सुमारे तीन किलोमीटर इतकी असावी असं मानलं जात होतं. ती काही ठिकाणी कमी आहे, तर काही ठिकाणी जास्त. तरीसुद्धा या काळ्या पाषाणाच्या तळापर्यंत जाणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे त्याच्या खाली नेमकं काय आहे, हे माहीत व्हायला मार्गच नव्हता.
कोयनेतील भूकंपाच्या अभ्यासाच्या निमित्ताने जे “ड्रिल” खणले गेले, त्याद्वारे पहिल्यांदाच आपल्या खडकाचा तळ गाठणे शक्य झाले. त्याच्या तळाशी असलेल्या खडकांचे नमुनेसुद्धा आपल्या हाती लागले. त्यात “ग्रॅनाईट” हा अग्निजन्य खडक आणि काही “नाइसेस” प्रकारचे रूपांतरित खडक असल्याचे आता आपल्याला ठामपणे माहीत झालं आहे.
(पण हे गुपित उलगडल्यामुळे काय बरं–वाईट झालंय..?
समजून घ्यायचंय..?
फक्त दोनच दिवस वाट पाहा..
कुणी तरी म्हटलंय ना– सब्र का फल मीठा होता है !)
– अभिजित घोरपडे
www.abhijitghorpade.wordpress.com
( पुढच्या पोस्टमध्ये जरूर वाचा… कोयना भूकंप पुराण- २ )
Eagerly waiting for next part of this blog post. Subject is interesting & we can expect big revelations.
Thanx Sagar… will get back soon.