अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभाग खरंच देऊ शकतो का?

सांगा, का नाही येणार पूर? ; भाग ४

कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता..

हवामान विभागाने २३ ऑगस्ट २०१९ या दिवसासाठी दिलेला हा पावसाचा अंदाज.

या अंदाजाचा नेमका अर्थ काय आणि यावरून धरणांच्या क्षेत्रात नेमका किती पाऊस पडणार आहे किंवा निदान धरणांचे पाणलोट असलेल्या क्षेत्रांमध्ये पावसाची स्थिती काय असेल हे समजेल का?

अभिजित घोरपडे

संपादक, “भवताल” / abhighorpade@gmail.com

Pune IMD 1

पुणे वेधशाळा (भारतातील जुनी वेधशाळा) स्थापना – १९२८

थेट सांगायचे तर पावसाच्या अंदाजाबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा अनुभव चांगला नाही.

“या वेळच्या पावसाळ्यातील जून व जुलै महिन्यांमधील अंदाज उपयोगाचा ठरलाच नाही. मोठा पाऊस पडेल असा अंदाज जाहीर केला जात होता, पण प्रत्यक्षात तो तसा पडला नाही. स्वाभाविकपणे प्रत्यक्ष मोठा पाऊस पडला, तेव्हा हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजावर विश्वास कसा ठेवायचा? अशी स्थिती धरणातील पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्यांची होते,” जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात.

पुराची तीव्रता काही प्रमाणात कमी करायची असेल तर धरणांच्या क्षेत्रात आगामी एक ते सात दिवसांमध्ये (आठवड्याभरात) पावसाची स्थिती काय असणार आहे याचा नेमका अंदाज मिळणे आवश्यक आहे. विशेषत: जुलै महिन्याचा उत्तरार्ध आणि ऑगस्ट महिन्यात असा नेमका अंदाज मिळायला हवा. कारण तोवर धरणांमध्ये पाणी जमा झालेले असते आणि आपल्याकडे सर्वाधिक पावसाचा हाच काळ असतो.

पण प्रश्न हा आहे की, असा नेमका व अचूक अंदाज देण्याची हवामान विभागाची क्षमता आहे का?

याबाबतची नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ आणि पुण्यातील उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

हवामान विभाग कोणकोणते अंदाज देते?

Pune IMD 2

हवामान विभागाकडून वेगवेगळ्या कालावधीसाठी पावसाचे अंदाज दिले जातात.

१. लाँग रेंज किंवा सिझनल फोरकास्ट (सपूर्ण हंगामाचा अंदाज)

मोसमी पावसाच्या कालावधीसाठीचा (जून ते सप्टेंबर) हा अंदाज. हा संपूर्ण भारतासाठी दिला जातो आणि त्याच्या चार विभागांपुरताच दिला जातो.

२. एक्सटेंडेड फोरकास्ट (एक महिन्यापर्यंत)

हा पावसाचा अंदाज पुढील एका महिन्याच्या कालावधीसाठी जाहीर केला जातो. तो संपूर्ण भारतासाठी दिला जातो. मात्र, त्याचा नकाशा दिला जात असल्याने आपल्या उपविभागासाठी स्थिती काय असेल हे शोधून काढता येते. हवामान विभागानुसार महाराष्ट्राचे चार उपविभाग आहेत- कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. या क्षेत्रांवर पुढील महिन्यात पाऊस कसा असेल याचा अंदाज मिळू शकतो.

३. मिडियम रेंज फोरकास्ट (१० दिवसांपर्यंतचा)

हा जिल्हा किंवा आता तालुका पातळीवरही दिला जातो. मात्र, त्याची अचूकता पडताळून पाहण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत काहीच सांगता येत नाही.

४. शॉर्ट रेंज फोरकास्ट (३ दिवसांपर्यंतचा)

हा अंदाजसुद्धा तालुका, जिल्हा व काही शहरांच्या पातळीवर दिला जातो.

५. नाऊकास्टिंग (काही तासांपर्यंतचा)

अंदाजांची विश्वासार्हता आणि उपयुक्तता

Rain1

पाऊस नेमका कुठे पडणार हे हवामान विभागाच्या अंदाजावरून समजत नाही.

हे अंदाज दिले जातात, पण प्रश्न आहे त्यांच्या विश्वासार्हतेचा आणि उपयुक्ततेचा.

या अंदाजांची विश्वासार्हता शोधण्यासाठी दिलेला अंदाज आणि प्रत्यक्ष पडलेला पाऊस यांची तुलना करून सविस्तर अभ्यास करावा लागेल. त्यानंतर विश्वासार्हता काढता येईल. मोसमी पावसाच्या म्हणजेच सिझनल अंदाजाच्या विश्वासार्हतेबाबत बोलले जाते, चर्चा होते. मात्र, इतर अंदाजांच्या विश्वासार्हतेबाबत पुरेसा अभ्यास झालेला नाही, त्याबाबत बोललेही जात नाही.

पुराच्या काळातील धरणांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने या सर्वच अंदाजांची उपयुक्तता अतिशय कमी आहे. कारण या अंदाजावरून (तो अचूक ठरला तरीसुद्धा !) पाऊस नेमका कोणत्या क्षेत्रावर पडणार आहे, याची कल्पना येत नाही. सर्वसाधारण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर (ज्याला हवामान विभागाकडून “घाट सेक्सन” म्हटले जाते) किती पाऊस पडणार हे समजले तरी विशिष्ट धरणाच्या क्षेत्रात किंवा विशिष्ट धरणप्रणालीच्या क्षेत्रात किती पाऊस पडणार, हे समजत नाही. मग त्याचा धरणातील पाणी सोडण्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपयोग काय?

या व्यवस्थापनाच्या दृष्टीने धरणक्षेत्रात पाऊस पडणार का आणि किती पडणार, हे समजल्याशिवाय या अंदाजांची उपयुक्तता असणार नाही. एकूण घाटासाठी मोठ्या पावसाचा अंदाज दिला असल्यास आपल्या धरणाच्या क्षेत्रातही जास्त पाऊस पडेल, एवढेच ढोबळमानाने मानता येईल. याचा यापेक्षा अधिक उपयोग नाही.

धरणक्षेत्रासाठी पावसाचा अचूक अंदाज देता येईल का?

सध्याच्या घडीला हवामान विभागाकडून असा अंदाज दिला जात नाही. हवामान विभागाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत असे आहेत. याशिवाय वेगवेगळी प्रादेशिक कार्यालये (मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, गुवाहटी, दिल्ली, वगैरे.) यांचे कार्यक्षेत्र काही राज्यांचे असे मिळून आहे. त्यामुळे या विभागाच्या दृष्टीने विशिष्ट धरणाच्या प्रणालीतील पावसाचा अंदाज देणे ही खूपच छोट्या भौगोलिक क्षेत्रावरील बाब झाली. त्यामुळे हवामान विभागाकडून असा अंदाज दिला जात नाहीत. भविष्यातही दिला जाणार का, याबाबत सांगता येत नाही. या अंदाजांसाठी स्वतंत्र केंद्र / गट / विभाग / यंत्रणा लागेल.

असे स्वतंत्र केंद्र / विभाग उभारला, तरी छोट्या भौगोलिक क्षेत्रावरील अंदाज नेमका अंदाज देणे शक्य होईल का? हेही तपासून पाहायला हवे.

छोट्या क्षेत्रासाठी अचूक अंदाज देण्यात दोन मर्यादा असू शकतात –

१. मुळात हवामानशास्त्राच्या मर्यादा असल्याने हे शक्य नसणे किंवा

२. आपला हवामान विभाग किंवा यंत्रणा हे करण्यात कमी पडतात.

धरणक्षेत्रातील पावसाचे मॉडेल शक्य

Windy.com1a

वेगवेगळ्या भागातील स्थानिक पावसाचा अंदाज देणाऱ्या windy.com सारख्या अनेक वेबसाईट आहेत.

याबाबत डॉ. कुलकर्णी सांगतात, “छोट्या क्षेत्रावर अंदाज देताना हवामानशास्त्राच्या मर्यादा निश्चितच येतात. मात्र, साधनसामुग्री व मूलभूत सुविधा उभारल्यास त्याची अचूकता वाढवणे शक्य आहे. तसे प्रयोग करायला हवेत. धरणांच्या क्षेत्रातील पावसासाठी ‘क्वांटिटिटिव्ह प्रेसिपिटेशन फोरकास्टिंग’ (QPF) यासारखे तंत्र वापरता येऊ शकते. धरणक्षेत्रावरील ढगांच्या, पावसाच्या काही मिनिटांच्या अंतरा-अंतराने नोंदी मिळवण्याची यंत्रणा बसवली, तर धरणातील पावसाच्या अंदाजासाठी उत्तम मॉडेल तयार करता येऊ शकेल. त्यासाठी रडार, स्वयंचलित पर्जन्यमापकांचे जाळे व इतर यंत्रणा उभारायला हवी. तूर्तास उपग्रहांच्या मदतीने मोफत मिळणाऱ्या नोंदी वापरूनही हा प्रयोग करता येईल. पुढे सक्षम व सुसज्ज यंत्रणा उभारून त्यात अचूकता आणता येईल.”

“आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही संस्था जगभरातील ठिकाणांचा पावसाचा रोजचा अंदाज बांधतात आणि त्यांच्या वेबसाईट्सवर प्रसिद्धही करतात. त्या भारतातील सर्वच भागांसाठी अंदाज देतात. windy.com ही त्यापैकी एक. त्यांच्या संकेतस्थळावर एखाद्या शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी हवामानाचा एकच अंदाज नसतो, तर तो त्यातील प्रत्येक भागानुसार दिला जातो. केवळ तालुकाच नव्हे, तर त्यातील वेगवेगळ्या भागांसाठी स्वतंत्र अंदाज दिला जातो. ही सुविधा उपलब्ध आहे. ती अधिक सुधारीत करून धरणांसाठी वापरणे नक्कीच शक्य आहे. त्यामुळे आपण ठरवलेच तर धरणक्षेत्रासाठी स्वतंत्र अंदाज देणे शक्य आहे. त्याची अचूकताही वाढवता येऊ शकेल.”

नदीखोऱ्यांधील पाण्याचा अंदाज

Flood Water 1a

हवामान विभागाच्या ‘हायड्रॉलॉजी’ विभागाकडून विविध नद्यांच्या उपखोऱ्यांंसाठी किती पाणी निर्माण होईल याबाबत अंदाज दिला जातो. (फोटो – हवामान विभाग वेबसाईट)

भारतीय हवामान विभागामध्ये “हायड्रॉलॉजी” हा उपविभाग आहे. या विभागातर्फे देशातील २० प्रमुख नद्या आणि त्यांच्या सुमारे शंभर उपनद्यांच्या खोऱ्यांसाठी एक सेवा उपलब्ध करून दिली जाते. त्यानुसार नदीखोरी आणि उपखोरी यांच्यामध्ये किती पाऊस पडेल आणि पाणी निर्माण होईल याचा पुढील काही आठवड्यांचा अंदाज जाहीर केला जातो. त्याची गरज केंद्रीय जल आयोग (सी.डब्ल्यू.सी.) यांच्यासाठी असते. मात्र, ही खोरी, उपखोरी यांचे भौगोलिक क्षेत्र खूपच मोठे असते. त्यामुळे त्याचा थेट उपयोग होण्यास मर्यादा आहेत. मात्र, त्यावरून आगामी काही आठवड्यांमध्ये हवामानाची स्थिती काय असेल आणि आपल्या परिसरात किती प्रमाणात पाणी निर्माण होईल याच साधारण अंदाज येऊ शकतो.

मात्र, असा काही अंदाज दिला जातो, याची माहिती जलसंपदा विभागाला किंवा इतर संबंधित यंत्रणांना आहे का? इथे विविध विभागांमधील संवाद व समन्वयाचा मुद्दा उपस्थित होतो.

संवाद, समन्वय आणि बरेच काही

पावसाचा अंदाज देणारा हवामान विभाग आणि त्या अंदाजाची गरज असलेला, धरणांचे व्यवस्थापन करणारा जलसंपदा विभाग यांच्यात संवाद-समन्वय आहे का? याचे उत्तर नकारार्थी आहे. हवामान विभागाकडून धरणांसाठी म्हणून स्वतंत्र अंदाज दिले जात नाहीत. पण पावसाची सर्वसाधारण काय स्थिती असेल हे हवामान विभागाकडून समजून घेण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून केला जात नाही. सांगली, कोल्हापूर परिसरात २००५ साली निर्माण झालेल्या महापुराच्या परिस्थितीनंतर काही काळासाठी वैयक्तिक पातळीवर हा संवाद झाला. मात्र, तो एखाद्या अधिकाऱ्याने पुढाकार घेतल्याने सुरू झालेला होता. ती कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने स्वाभाविकपणे तो पुढे बंद पडला.

हवामान विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्यात समन्वयच नाही. त्यामुळे हवामानाचा अंदाज मिळाला किंवा नाही, तरी त्याचा धरणातून पाणी सोडण्याच्या व्यवस्थापनासाठी विशेष उपयोग होत नाही. ही बाब पूरपरिस्थितीत विपरित परिणाम करते.

हा संवाद वाढवायला हवा. धरण क्षेत्रातील पावसाच्या अंदाजाच्या नेमक्या गरजा काय, त्या कशा पूर्ण करता येतील यासाठी हवामान विभागाकडून सल्ला-सेवा घ्यायला हवी. याशिवाय खास धरणांच्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज मिळवण्याची यंत्रणाही उभारायला हवी. त्यासाठी विशेष असा खर्चही करावा लागणार नाही. असे केले तर पुराची आपत्ती काही प्रमाणात कमी करण्यास नक्कीच मदत होईल.

त्यासाठी आपण पुढाकार घेणार का?

(या मालिकेसाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री. नंदकुमार वडनेरे, निवृत्त सचिव श्री. सतीश भिंगारे, डॉ. दि. मा. मोरे, कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता श्री. संकपाळ, पुण्यातील अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण कोल्हे, हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी, कोल्हापूर पुण्यनगरीचे संपादक श्री. अशोक घोरपडे, सांगली पुण्यनगरीचे श्री. समाधान पोरे, श्री. प्रविण शिंदे, सेंट्रल वॉटर कमिशनचे कुरुंदवाड येथील प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.)

 • अभिजित घोरपडे (abhighorpade@gmail.com)

………….

आता गावं हलवायची का पुरासोबत राहायचं?

“सांगा, पूर का नाही येणार?”

या लेखमालेचा शेवटचा भाग लवकरच…

ब्लॉग आवडला तर फॉलो करा आणि इतरांसाठीही शेअर करा.

अलमट्टी धरणाच्या वाढत्या उंचीची टांगती तलवार !

सांगा, का नाही येणार पूर?  ;  भाग ३

सांगली, कोल्हापूर शहरे आणि जिल्ह्यांमधील गावांनी तब्बल १० दिवस महापूर अनुभवला. त्याचे परिणाम पुढे आणखी काही महिने भोगावे लागतील. महापुराच्या कारणांपैकी एक म्हणजे कर्नाटकमधील अलमट्टी धरण. सध्या अलमट्टीत साठणाऱ्या पाण्याची कमाल पातळी ५१९.६० मीटर इतकी आहे. कर्नाटकने या ती ५२४.२५ मीटरपर्यंत वाढवण्याची परवानगी मिळवलेली आहे. आतापेक्षा ४.६५ मीटर म्हणजेच १५ फुटांनी जास्त. त्यांनी त्या पातळीपर्यंत पाणी साठवले तर..??

अभिजित घोरपडे

संपादक, “भवताल” / abhighorpade@gmail.com

Almatti1

कर्नाटकमधील अलमट्टी धरण… पुराचे कारण??

सांगली, कोल्हापूरमधील पुराशी अलमट्टीचा संबंध आहे का, याबाबत दोन टोकाचे मतप्रवाह आहेत. काही जण थेट अलमट्टीला दोषी धरतात, अगदी इतर कारणांकडे कानाडोळा करून अलमट्टीचा बागुलबुवा उभा करतात. दुसरीकडे अलमट्टीचा पुराशी संबंध नसल्याचे सांगितले जाते. कृष्णा पाणीतंटा लवादात आपण हा संबंध सिद्ध करू शकलो नाही. तर मग अलमट्टीकडे बोट दाखवण्यात काय अर्थ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वस्तुस्थिती या दोन टोकाच्या मतप्रवाहांच्या  मध्ये कुठेतरी असेल असे वाटते आणि ते आहेसुद्धा.

अलमट्टी धरणाबाबत..

अलमट्टी हे कर्नाटकच्या दृष्टीने अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याचे मूळ नियोजन होते, १९६० सालातील. त्या वेळी या धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्राला काही कल्पना दिली गेली नव्हती, असे राज्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात. कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत लवाद १९७४ ते ७६ या काळात कार्यरत होता. त्यावेळी कर्नाटकने या धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्राला कल्पना दिली नव्हती. तसेच, संभाव्य परिणामांबाबत महाराष्ट्राची सहमतीही घेण्यात आली नव्हती. १९७६ नंतर कृष्णा पाणीतंटा लवाद पुन्हा २००० साली स्थापन झाला. तेव्हा अलमट्टीची कल्पना आली. त्याआधीच त्यांनी धरण बांधायला सुरुवात केली होती. या धरणाची पहिल्या टप्प्यातील उंची ५१९.६० मीटर इतकी होती. या उंचीच्या धरणात १६९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी साठवण्याचे नियोजन होते. (सध्या या धरणात इतकेच कमाल पाणी साठवण्याची क्षमता असताना महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये १० ते १२ दिवस महापूर ठाण मांडून होता.)

Almatti3

अलमट्टी धरणाचा अथांग पसरलेला जलाशय

याच्या पुढची गोष्ट म्हणजे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणात ५२४.२५ मीटरपर्यंत पाणी अडवण्याची परवानगी मिळवली आहे. त्यांनी त्याची तयारीसुद्धा केलेली आहे. त्या उंचीवर पाणी अडवल्यास या धरणात तब्बल ३०३ टीएमसी इतका पाणीसाठा होऊ शकेल. (कोयनेत सुमारे १०५ टीएमसी इतक्या पाण्याचा साठा करता येतो.) आताच्या कायदेशीर तरतुदींनुसार कर्नाटक ५२४.२५ मीटर पातळीपर्यंत पाणी साठवू शकते. कायदेशीर बाबींचा विचार केला तर त्यांना तसे करण्यापासून आपण सध्या तरी रोखू शकणार नाही.

असे का घडले?

almatti-village-gate-2.jpg

अलमट्टी, कर्नाटक राज्य

अलमट्टी धरणाच्या उंचीचा आपल्या राज्यातील पूरपरिस्थितीवर परिणाम होतो, हे महाराष्ट्राचे प्रतिनिधी सिद्ध का करू शकले नाहीत? हा कळीचा मुद्दा आहे. याचे दोन अर्थ निघतात-

१. या मुद्द्यातच तथ्य नाही किंवा

२. हा संबंध दाखवून देण्यात आपण कमी पडलो.

नेमके काय घडले याबाबत राज्याचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी श्री. नंदकुमार वडनेरे सांगतात. ते या प्रक्रियेत महाराष्ट्राचे प्रतिनधी म्हणून सहभागी होते. “अलमट्टी धरणाची इतकी उंची वाढवू नका हा मुद्दा आम्ही लावून धरला होता. त्याचा आमच्या राज्यावर परिणाम होऊ शकतो, ही भीती व्यक्त केली होती. मात्र, आम्ही ते कागदावर दाखवून देऊ शकलो नाही. अलमट्टी धरण ते महाराष्ट्रातील शेवटचा राजापूर बंधारा यातील अंतर २३० किलोमीटर आहे, तर अलमट्टी धरण ते सांगली शहर यातील अंतर २७० किलोमीटर इतके आहे.  इतक्या अंतरापर्यंत अलमट्टीच्या फुगवट्याचा परिणाम पोहोचत नाही. हा फुगवटा कर्नाटक राज्यातच जिरतो, हे लवादाला पटवून देण्यात कर्नाटकच्या वकिलांची टीम यशस्वी ठरली,” श्री. वडनेरे सांगतात.

अलमट्टीशी संबंध जोडण्यास वाव कसा?

अलमट्टीचा महाराष्ट्रातील पुराशी संबंध नसल्याचे कर्नाटकने सिद्ध केले ते कागदोपत्री किंवा मॅथेमॅटिकल मॉडेल्सच्या आधारे. कृष्णा नदीसारख्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेत प्रत्यक्ष जमिनीवर काय घडते याचे फिजिकल मॉडेल तयार करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे वस्तुस्थिती बरीच वेगळी असू शकते.

अलमट्टी धरणामुळे थेट पूर येत नाही असे मानले, तरी त्या धरणाच्या फुगवट्यामुळे पाणी वाहून जाण्यास अवरोध होणार हे निश्चित. तसे निरीक्षणही आहे. पाण्याचा वेग फारसा नसला तरी अलीकडे कृष्णा नदीचे व तिच्या उपनद्यांचे पाणी ओसरण्यास खूप जास्त वेळ लागतो. या वेळचा पूर तर तब्बल १० ते १२ दिवस ठाण मांडून होता.

CWC quote about Kurundwad flood

पूर न ओसरण्यास अलमट्टी धरणाचा फुगवटा जबाबदार असल्याबाबतचा उल्लेख (वडनेरे समिती अहवाल, पान क्र. ११८)

सांगली आणि कोल्हापूर भागात २००५ सालीसुद्धा या महापूर आला होता. त्या वेळीसुद्धा असेच नुकसान झाले होते. त्यानंतर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्री. वडनेरे  यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यांनी विविध ठिकाणांना भेटी दिल्या, लोकांशी चर्चा केली. त्यांनी कुरुंदवाड येथे सेंट्रल वॉटर कमिशनच्या (सी.डब्ल्यू.सी.)  अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात “पूर लवकर न ओसरण्यामागे अलमट्टी धरण आणि त्याच्या वरच्या बाजूला कर्नाटकच्या हद्दीत असलेला हिप्परगी बराज कारणीभूत असल्याचे” म्हटले होते. त्याचा उल्लेख वडनेरे समितीच्या अहवालात पान क्र. ११८ वर करण्यात आल आहे.

या परिस्थितीत “तेव्हा आम्ही सिद्ध करू शकलो नाही” असे म्हणून गप्प बसायचे की बदलत्या परिस्थितीत याचा पुन्हा आढावा घ्यायचा?.. यावर निर्णय घ्यावाच लागेल.

हो, आणि तोसुद्धा अलमट्टी धरणात कर्नाटक राज्याकडून ५२४.२५ मीटर पातळीपर्यंत पाणी अडवायच्या आत!!

एवढं तर करू या..

Almatti village, gate1

अलमट्टी धरणाकडे जाणारे प्रवेशद्वार

अलमट्टी धरणाच्या अनुषंघाने कृष्णा नदीखोऱ्याचे “फिजिकल मॉडेल” तयार करणे अगदीच शक्य आहे. त्यासाठी सेंट्रल वॉटर अँड पॉवर रीसर्च स्टेशन (CWPRS) यासारखी उत्तम संस्था आपल्याकडे पुण्यात आहे. या विषयातील तज्ज्ञांच्या मतानुसार, यासाठी खर्च येऊ शकतो- पन्नास लाख ते कोटभर रुपये. काळ जाईल सहा-आठ महिन्यांचा. आताच्या महापुरात काही हजार कोटी रुपयांचे नुकसान, पन्नाहून अधिक लोकांचे बळी आणि प्रचंड त्रास सहन केल्यावर हा अभ्यास हाती घेण्याचा मार्ग निवडणे नक्कीच ठरेल.

त्या दृष्टीने आपण काही करतो का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

नाहीतर ५२४.२५ मीटरची टांगती तलवार लोकांची झोप उडवणार हे निश्चित !

(या मालिकेसाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री. नंदकुमार वडणेरे, निवृत्त सचिव श्री. सतीश भिंगारे, डॉ. दि. मा. मोरे, कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता श्री. संकपाळ, पुण्यातील अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण कोल्हे, हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी, कोल्हापूर पुण्यनगरीचे संपादक श्री. अशोक घोरपडे, सांगली पुण्यनगरीचे श्री. समाधान पोरे, श्री. प्रविण शिंदे, सेंट्रल वॉटर कमिशनचे कुरुंदवाड येथील प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.)

(लेखातील सर्व छायाचित्रे  ‘सांगली ते अलमट्टी’ या दौऱ्यात अभियंता श्री. मदन शहा, सांगली आणि अभिजित घोरपडे यांनी काढली आहेत.)

……….

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अंदाज खरा ठरतो का?

(“सांगा, का नाही येणार पूर?” या मालिकेचा चौथा भाग- लवकरच याच ब्लॉगवर)

.

ब्लॉग जरूर वाचा.

आवडला तर फॉलो करा आणि इतरांसाठी शेअरही करा..

महापूर कोणाच्या माथी मारायचा – पावसाच्या, अतिक्रमणांच्या की अलमट्टीच्या??

सांगा, का नाही येणार पूर? ; भाग २

महापूर आला, नुकसान झाले म्हणजे ते कोणाच्या तरी माथी मारायला लागणारच की!
या वेळीही तसेच होतेय- पुरासाठी कोणाला ना कोणाला जबाबदार धरले जातेय.
तुम्हीच सांगा, या वेळी कोणाला जबाबदार धरायचे??

अभिजित घोरपडे
संपादक, “भवताल” / abhighorpade@gmail.com

Hippargi2

संथ पाहणारे कृष्णेचे पाणी पुराच्या वेळी रौद्र रूप धारण करते

आम्ही प्रत्यक्ष केलेली पाहणी, तपासलेली ऐतिहासिक आकडेवारी, स्थानिक अभ्यासक व तज्ज्ञांशी केलेले बोलणे, आधीचे अहवाल, तुलना यावरून मुख्यत: सहा-सात कारणे पुढे आली आहेत. पुरासाठी कारणीभूत होण्यास त्यांचा हात किती यानुसार त्यांचा क्रम कसा लावायचा याबाबत मतभेद होतील, पण या कारणांबाबत सहमती असायला हरकत नाही.

या ठिकाणी राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव डॉ. नंदकुमार वडनेरे यांनी या कारणांना दिलेले प्राधान्यक्रम देत आहोत. श्री. वडनेरे हे २००५ च्या पुरानंतर शासनाने नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ते कृष्णा खोऱ्यात अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, कार्यकारी संचालक तसेच, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव होते.

ते स्वत: जलवहन शास्त्रातील (हायड्रॉलॉजी) तज्ज्ञ आहेत. त्यांनी कृष्णा पाणीतंटा लवादावर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. ते आता निवृत्त असल्याने मोकळेपणाने भूमिका मांडण्यास त्यांना बंधने नसावीत. त्यामुळे या कारणांना त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम देत आहोत.

अर्थातच, या प्राधान्यक्रमावर मतभेद असू शकतात हे आम्ही नम्रपणे मान्य करत आहोत.

कारणे (अग्रक्रमानुसार):

१. प्रचंड पाऊस (कृष्णा खोरे व उपखोरी)

वर्षभरात पडणाऱ्या पावसापैकी ५० ते ६० टक्के पाऊस केवळ आठवड्याभरात पडला. याबाबत सविस्तर विवेचन मागच्या भागात केलेलेच आहे.

२. कृष्णा नदी आणि सांगली, कोल्हापूरची भौगोलिक परिस्थिती

Haripur1

सांगलीजवळील हरीपूर येथे कृष्णा नदीला येऊन मिळणारी वारणा नदी (डावीकडील)

हा मुद्दा अनेकदा दुर्लक्षिला जातो, विचारात घेतला जात नाही. सांगलीपासून जवळच दोन मोठे संगम आहेत. सांगलीतून कृष्णा नदी वाहते. सांगलीची हद्द सोडली की खाली काही अंतरावरच हरिपूर या ठिकाणी तिला वारणा नदी येऊन मिळते. पुढे नरसोबाची वाडी येथे तिला पंचगंगा ही नदी येऊन मिळते. ज्या वेळी सर्व नद्या दुथडी भरून वाहत असतात, तेव्हा हे दोन्ही संगम पाण्याचा फुगवटा वाढण्यास कारणीभूत ठरतात. याशिवाय सांगली शहराची भौगोलिक रचना बशीसारखी आहे. ते नदीकाठाच्या पलीकडे खोलगट भागात बसले आहे. त्यामुळे पाणी नदीच्या पात्रातून बाहेर पडले की ते बाहेरच साचून राहते. मोठा उतार नसल्याने पाणी वेगाने नदीकडे वाहत नाही, तुंबून राहते.

कृष्णा नदी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून खाली उतरते, तेव्हा तिला बराच उतार असतो, पण कराड, सांगली आणि पुढे उतार कमी होत जातो. परिणामी, नदीच्या वाहण्याची गती मंदावते. म्हणजेच, “संथ वाहते कृष्णामाई”. याचबरोबर खुद्द कृष्णा नदी वळणावळणाने वाहते. त्यामुळे ती काठावर मोठ्या प्रमाणात गाळ जमा करते. ही बाबसुद्धा तिच्या वाहण्याची गती कमी करते.

कोल्हापूरच्या वरच्या बाजूला पाच नद्या एकत्र येतात. या नद्यांचे उगम मोठ्या पावसाच्या प्रदेशात आहेत. त्यामुळे या शहराला पाण्याचा वेढा पडतो आणि पुराचा धोका वाढतो.

३. नदी व्यवस्थेवरील अतिक्रमणे –

Sangli oat1

सांगलीत जिथे पाणी साठण्यासाठीच्या नैसर्गिक सखल भाग (ओत) होते, तिथे अशा इमारती उभ्या राहिल्या आहेत.

कृष्णा खोऱ्यात प्रत्यक्ष नद्यांच्या पात्रात आणि नद्यांच्या प्रणालीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ओढे, नाले यांच्यासारखे नैसर्गिक प्रवाह बुजवणे ही नियमित बाब झालेली आहे. २००५ व २००६ च्या पुरानंतरही हे सुरूच आहे. किंबहुना, त्यानंतर या शहरांमधील बांधकामांचा झालेला ‘विकास’ बोलका आहे.

याशिवाय सांगली (आणि कोल्हापूरसुद्धा!) शहरांमध्ये पूर शोषून घेण्याच्या व्यवस्था होत्या. सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात खोलगट भाग राखून ठेवले होते. त्यांना ‘ओत’ असे नाव दिले होते. पुराचे आलेले पाणी या ओतांमध्ये सामावले जायचे. त्यामुळे पुराची तीव्रता कमी व्हायची आणि पुराची पातळी कशी वाढते आहे याचा इशारासुद्धा मिळायचा. हे संपूर्ण ओत बुजवले गेले आहेत. त्यांच्यावर इमारती, बांधकामे झाली आहेत.

इतकेच नव्हे तर नद्याच्या पात्रात झालेले अनेक पूल आणि बंधारे हेसुद्धा पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण करत आहेत. इतकेच नव्हे तर मागच्या पुरानंतर झालेल्या अभ्यासात, परिसरातील उसासारख्या दाट पिकांचे वाढलेले क्षेत्रसुद्धा पाण्याला अवरोध करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

४. पूरनियमनापेक्षा पाणी अडवण्याची मानसिकता –

Hippargi1

धरणे लवकरात लवकर भरून घेणे ही अलीकडची मानसिकता आहे, मग पूर सामावून घेण्यासाठी फारशी जागा उरत नाही.

धरणांच्या विविध उद्दिष्टांपैकी प्रमुख म्हणजे पाण्याची साठवणूक आणि पुराची तीव्रता कमी करण्यास हातभार. अलीकडे यापैकी पाण्याची साठवणूक या उद्दिष्टालाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणी अडवण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. त्याला सामान्य माणूस, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, जलसंपदा विभाग यापैकी कोणीही अपवाद नाही. एखाद्या वर्षी पुराचे नियमन करण्यासाठी धरणांची पातळी कमी केली आणि पुढे धरणे पुरेशी भरली नाहीत, तर जनतेमध्ये रोष निर्माण होतो. (गेल्याच वर्षी काही भागात याचा अनुभव आला.) त्यामुळे धरण भरण्याला प्राधान्य दिले जाते.

५. राज्यातील एकात्मिक धरण व्यवस्थापन परिणामकारक नसणे –

कृष्णेसारख्या नदीखोऱ्यात एकेका धरणाचे व्यवस्थापन स्वतंत्रपणे करणे योग्य नाही. त्याऐवजी एका खोऱ्यातील सर्वच धरणांचे नियमन एकात्मिक यंत्रणेद्वारे व्हायला हवे. हे सध्या परिणामकारकरीत्या होत नाही. तसे झाले तर पुराची तीव्रता कमी करणे शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि जलवहनशास्त्रातील (हायड्रॉलॉजी) तज्ज्ञांची आवश्यकता असते. प्रत्यक्षात जलसंपदा विभागात या तज्ज्ञ मनुष्यबळाचा कमालीचा अभाव आहे. त्यामुळे हे व्यवस्थापन शक्य होत नाही.

६. अलमट्टी धरण –

सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या पुरामध्ये अमलट्टीचा हात किती? याबाबत मतभेद आहेत. हे धरण कृष्णा नदीवरच पण कर्नाटक राज्याच्या हद्दीत आहे. ते सांगली शहरापासून २७० किलोमीटर अंतरावर आहे. कृष्णेवर महाराष्ट्राच्या हद्दीत शेवटचा राजापूर बंधारा आहे. या बंधाऱ्यापासून अलमट्टी २३० किलोमीटर अंतरावर आहे. या धरणाची सध्याची कमाल पाणीपातळी ५१९.९६ मीटर इतकी आहे. त्यात पाणी साठवले की त्याचा फुगवटा निर्माण होतो. कृष्णा नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. त्यामुळे पूर जास्त काळ कायम राहतो, असा या धरणावरचा आक्षेप.

महाराष्ट्राने तसा आक्षेप घेतला होता. या आक्षेपावर कृष्णा पाणीतंटा लवादात सुनावणी झाली. अलमट्टी धरणामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पुराची तीव्रता वाढते, ही बाब महाराष्ट्राचे प्रतिनिधी सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे अलमट्टीच्या पाणीफुगवट्याचे संकट कायमचे उभे राहिले आहे.

७. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील समन्वयाचा अभाव –

कृष्णा नदीतील पुराचे नियमन करताना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीनही राज्यांनी ते एकत्रितपणे करणे गरजेचे आहे. त्यासाठी तिन्ही राज्यांची एक स्वतंत्र अथॉरिटी असावी. ही बाब प्रत्यक्षात आलेली नाही.

.

आताच्या पुरात सांगली, कोल्हापूर शहरे आणि जिल्ह्यामधील अनेक गावांची प्रचंड हानी झाली. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचाही अंदाज घ्यावा लागेल. हवामान बदलाच्या परिस्थितीत अतिवृष्टीचे वाढणारे प्रमाण, कमी वेळात जास्त पावसाचा धोका याची धास्ती आहेच. त्याचबरोबर आणखी एक टांगती तलवार आहे, ती अलमट्टी धरणाच्या भविष्यातील उंचीची !

संदर्भासाठी नदीची अंतरे (किलोमीटरमध्ये):

कोयना धरण ते कराड               :           ६८

कराड ते  सांगली                       :           १०७

सांगली ते राजापूर बंधारा            :           ३८

राजापूर ते हिप्परगी बराज          :           ९६

हिप्परगी ते अलमट्टी धरण          :           १३६

कोयना ते अलमट्टी धरण            :           ४४५

सांगली ते अलमट्टी धरण            :           २७०

(या मालिकेसाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री. नंदकुमार वडणेरे, निवृत्त सचिव श्री. सतीश भिंगारे, डॉ. दि. मा. मोरे, कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता श्री. संकपाळ, पुण्यातील अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण कोल्हे, हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी, कोल्हापूर पुण्यनगरीचे संपादक श्री. अशोक घोरपडे, सांगली पुण्यनगरीचे श्री. समाधान पोरे, श्री. प्रविण शिंदे, सेंट्रल वॉटर कमिशनचे कुरुंदवाड येथील प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.)

……

अलमट्टी धरणाची पाणीपातळी,

आणखी १४ फुटांनी वाढवली तर..?

(या मालिकेचा तिसरा भाग- उद्याच, बुधवार – दि. २१ ऑगस्ट २०१९ रोजी याच ब्लॉगवर..)

.

ब्लॉग जरूर वाचा.

आवडला तर फॉलो करा आणि इतरांसाठी शेअरही करा..

सह्याद्रीतील पावसाने चेरापुंजीला कुठच्या कुठे मागे टाकले!

सांगा, का नाही येणार पूर?  ;  भाग १
सांगली, कोल्हापूरचा भयंकर महापूर आता ओसरलाय, त्याबाबत सविस्तर लिहायची हीच वेळ आहे. या पुराच्या निमित्ताने अनेक उच्चांक झाले. निसर्गाचा रौद्रावतार म्हणजे काय, माणसाच्या चुकांची किती मोठी किंमत मोजावी लागले हेही स्पष्ट झाले. या पुराला असलेले अनेक पैलू व कंगोरे यांच्या अनुषंघाने वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही लेखमाला.

अभिजित घोरपडे

संपादक, “भवताल” / abhighorpade@gmail.com

Clouds1

२०१९ च्या जुलै अखेर आणि ऑगस्टची सुरुवातीला दोन आठवडे धो-धो पावसाने थेमान घातले होते.

पाथरपुंज.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेले हे ठिकाण.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येते.
या ठिकाणी १ जून ते १५ ऑगस्ट या काळात ७०३२ मिलिमीटर पाऊस पडलाय. म्हणजे तब्बल २७७ इंच
आणि जगातील सर्वाधिक पावसाचे समजल्या जाणाऱ्या चेरापुंजीचा याच काळातील आकडा आहे ५७८० मिलिमीटर.
एकटे पाथरपुंजच नव्हे तर महाबळेश्वरजवळील धोम-बलकवडी धरणाच्या क्षेत्रातील जोर (६८०० मिलिमीटर), पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाच्या क्षेत्रातील दावडी (६२२५ मिलिमीटर), कोयना धरणाच्या क्षेत्रातील नवजा (६११० मिलिमीटर) या ठिकाणीही या हंगामात ६००० हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
विशेष म्हणजे या हंगामात चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस असलेली डझनभर ठिकाणे आपल्याकडे सापडतील.
भारतीय हवामान विभागाची महाबळेश्वर येथील नोंद आहे, ६७०० मिलिमीटर. ही नोंदसुद्धा आपण चेरापुंजीला कुठल्या कुठे मागे सोडलेय याचा पुरावा देते.

हा झाला धरण क्षेत्रातील पाऊस. याशिवाय इतरत्र पडलेल्या पावसाची आकडेवारीसुद्धा कितीतरी पट अधिक असल्याचे सांगते. याचे एक उदाहरण म्हणजे सांगली जिल्ह्यातील येरळा नदी. ही नदी सर्वकाळ कोरडीठक्क असते. ती १४ वर्षांनंतर यंदा वाहिली; इतकी की पात्र सोडून इतरत्र पाणी पसरले. हे घडले ७ ऑगस्ट २०१९ रोजी. म्हणजे ऐन पुराच्या काळात.
मग सांगा का नाही येणार पूर??

राधानगरीचे सर्व्हिस गेट पहिल्यांदाच वर

Radhanagari2

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राधानगरी धरणावरील रस्ता

ठिकाण – राधानगरी धरण.
राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेले हे धरण. अर्थातच जिल्हा कोल्हापूर.
भोगावती नदीवरील धरण. भोगावती, तुळशी, सरस्वती, कुंभी, कासारी या पाच नद्या एकत्र येतात, तेव्हा पंचगंगा बनते. ती कोल्हापूर शहरातून वाहते आणि पुढे नरसोबाची वाडी येथे कृष्णी नदीला मिळते.

कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. संकपाळ सांगत होते, पाऊस किती भीतीदायक असू शकतो याची प्रचिती या वेळी घेतली.
राधानगरी धरण १९०८ साली बांधण्यात आले. या धरणाला स्वयंचलित म्हणजे अटोमॅटिक दरवाजे आहेत. धरणाची पातळी वाढली की हे दरवाजे आपोआप वर होतात आणि पाणी बाहेर पडते. मात्र, धरणात खूप जास्त वेगाने पाणी येऊ लागले तर धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी हे पाणी तातडीने बाहेर काढण्यासाठी तीन विशेष दरवाजांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना म्हणतेत- ‘सर्व्हिस गेट’. ही गेट प्रयत्नपूर्वक उघडावी लागतात.
राधानगरी धरणाच्या इतिहासात आतापर्यंत एकदाच हे ‘सर्व्हिस गेट’ उघडण्याची वेळ आली होती. वर्ष होते, २००५. त्या वेळी धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने तीनपैकी एक ‘सर्व्हिस गेट’ उघडावे लागले होते. मात्र, या वर्षी पावसाची तीव्रता इतकी होती की तीनही ‘सर्व्हिस गेट’ उघडावी लागली. ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुढे सलग तीन दिवस हे दरवाजे उघडे ठेवावे लागले. तरीसुद्धा पाण्याची पातळी धरणाच्या माथ्यापेक्षा केवळ तीन फुटांनीच खाली होती. यावेळी धरणावरून पाणी वाहण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्या धरणाचे नियमन करणाऱ्यांच्या दृष्टीने ते तीन दिवस तणावाचे होते.

Radhanagari1

राधानगरी धरणाचे स्वयंचलित (automatic) दरवाजे

राधानगरी क्षेत्रातील पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण काय सांगते?
२००५ सालच्या भयंकर पुराच्या वेळी महापुराच्या आधी सलग चार दिवस राधानगरीत दररोज सरासरी २१४ मिलिमीटर पाऊस पडत होता. या वेळी हा आकडा सरासरी ३४९ मिलिमीटर इतका होता. शिवाय या चार दिवसांच्या आधी सलग १२ दिवस संततधार पाऊस पडत होताच.
धरणाच्या क्षेत्रात इतका प्रचंड पाऊस होता, त्याचबरोबर तो इतर क्षेत्रातही होताच. जलसंपदा विभागाची आकडेवारी सांगते, कोल्हापूरच्या पंचगंगा नदीतून वाहून गेलेल्या एकूण पाण्यात राधानगरी धरणाचा वाटा होता फक्त १५ टक्के. उरलेले पाणी इतर क्षेत्रातील होते. ते पंचगंगेची पातळी वाढवत होते आणि पुढे धोका निर्माण करत होते.
मग सांगा, का नाही येणार पूर??

परिणाम व्हायचा तो झालाच!

इतका पाऊस पडल्यावर आणि इतर कारणे (याबद्दल पुढे बोलूच) असताना पाण्याची पातळी वाढली नाही तरच नवल!
या अनुषंघाने अनेक उच्चांक नोंदवले गेले. त्यापैकी एक म्हणजे जागोजागची पाण्याची पातळी.
कुरुंदवाड हे कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या संगमाजवळचे गाव. संगमाचे गाव असलेल्या नरसोबाची वाडी या गावाला लागूनच असलेले. या ठिकाणी सुंदर घाट आहे. या घाटावर सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधीसुद्धा आहे.

Kurundwad1

कृष्णा नदीच्या काठावरील कुरुंदवाड येथील प्रसिद्ध घाट

इथला घाट चढून महादेव मंदिरात जाताना पायऱ्यांवर काही खुणा आहेत. या खुणा आहेत, पूरपातळीच्या. वेगवेगळ्या वर्षी आलेल्या महापुराच्या खुणा इथल्या भितींवर कोरल्या आहेत. १९१४, १९३२, १९४१, १९५८, २००६ अशा वेगवेगळ्या  वर्षांच्या या खुणा. त्यात १९१४ आणि २००५ या वर्षातील पुराच्या खुणा लक्ष वेधून घेतात. १९१४ साली पातळी होती, ५३९.७२ मीटर. हा उच्चांक २००५ सालच्या महापुराने तोडला. दोन्ही पातळ्यांमध्ये अंतर होते, केवळ ४ सेंटीमीटरचे. २००५ साली पुराची पातळी ५३९.७६ मीटर इतकी नोंदवली गेली.

Kurundwad5

कुरुंदवाड घाट… १९१४ सालातील पुराची पातळी = ५३९.७२ मीटर; २००५ सालातील पुराची पातळी = ५३९.७६ मीटर

१९१४ आणि २००५ म्हणजे सर्वसाधारणपणे १०० वर्षांचा काळ. यामध्ये पातळीमध्ये विशेष फरक नव्हता. आता २०१९ साली ही पातळी प्रचंड वाढली. ती ५४१.२१ मीटरवर पोहोचली. म्हणजे २००५ पेक्षा तब्बल १.५० मीटरने जास्त. फुटामध्ये सांगायचे तर तब्बल पाच फूट.

हेच सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाहायला मिळाले. २००५ साली नदीपात्रापासून पुराची पातळी होती, ५३ फूट ६ इंच. यावेळी ही पातळी पोहोचली, ५७ फूट ५ इंचांवर… म्हणजे तब्बल चार फुटांनी जास्त.
कोल्हापुरात पंचगंगा नदी शहरात येण्याआधी एक बंधारा आहे. त्याचे नाव, राजाराम बंधारा.
या बंधाऱ्याजवळ नदीची पातळी मोजली जाते. आतापर्यंत सर्वाधिक पातळी होती, १९८९ साली. ती नोंद होती, ५० फूट ६ इंच.
त्यानंतर २००५ सालीसुद्धा पातळी एका फुटाने कमीच होती. मात्र, आताच्या पुरात ही पातळी आतापर्यंतच्या विक्रमापेक्षा पाच फुटांनी अधिक होती. आकडा होता, ५५ फूट ६ इंच.

याचा व्हायचा तो परिणाम झाला.
दोन्ही शहरे आणि जिल्ह्यांमधील गावे पाण्याखाली जाणअयाचे क्षेत्र कमालीचे वाढले.
पूर ओसरायला तितकाच जास्त वेळ लागला.

(या मालिकेसाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री. नंदकुमार वडणेरे, निवृत्त सचिव श्री. सतीश भिंगारे, डॉ. दि. मा. मोरे, कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता श्री. संकपाळ, पुण्यातील अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण कोल्हे, हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी, कोल्हापूर पुण्यनगरीचे संपादक श्री. अशोक घोरपडे, सांगली पुण्यनगरीचे श्री. समाधान पोरे, श्री. प्रविण शिंदे, सेंट्रल वॉटर कमिशनचे कुरुंदवाड येथील प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.)

 • अभिजित घोरपडे (abhighorpade@gmail.com)

 

पूर कोणाच्या माथी मारायचा,

पावसाच्या, अतिक्रमणांच्या की अलमट्टी धरणाच्या??

(या मालिकेचा दुसरा भाग- उद्या, मंगळवार – दि. २० ऑगस्ट २०१९ रोजी याच ब्लॉगवर..)

.

ब्लॉग जरूर वाचा.

आवडला तर फॉलो करा आणि इतरांसाठी शेअरही करा..

गडचिरोलीचा प्राचीन खजिना!

M03

वर्धम.. तालुका- सिरोंचा. जिल्हा- गडचिरोली. दाट जंगलाचा परिसर, नक्षलवाद प्रभावित भाग.
तिथं प्राचीन जीवाश्मांचा अतिशय मौल्यवान खजिना सापडलाय. मोठाले वृक्ष जीवाश्मांच्या रूपात सापडतात. इतकंच नव्हे तर डायनासोरची अंडी, इतर अवशेष, मासे, इतर जीवांचे जीवाश्मसुद्धा इथं आढळतात. बरेचशा नमुन्यांना आतापर्यंत ‘पाय फुटलेत’, पण आता वन विभाग तिथं फॉसिल पार्क विकसित करतोय.. एकदा पाहिलंच पाहिजे असं हे ठिकाण.

अभिजित घोरपडे

वर्धमच्या फॉसिल पार्कमध्ये फिरताना, काय पाहू आणि काय नको अशी अवस्था होते. गाव- वर्धम. तालुका- सिरोंचा. जि. गडचिरोली.. दाट जंगलाचा परिसर, नक्षलवाद प्रभावित भाग.

गेल्याच आठवड्यात तिथं जाणं झालं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आम्ही एक संग्रहालय उभारलंय. त्यासाठी काही जीवाश्म (फॉसिल) पाहण्यासाठी गेलो होतो. तिथं मोठ्या प्रमाणात वृक्षांचे जीवाश्म आढळतात. बरेचशा नमुन्यांना आतापर्यंत ‘पाय फुटलेत’. आता मात्र वन विभागाने काही काळजी घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून वर्धम इथं फॉसिल पार्क विकसित करण्याचं काम सुरू आहे.

M05

वर्धम फॉसिल पार्क, ता. सिरोंचा, जि. गडचिरेली

वैशिष्ट्य म्हणजे आजही तिथं पावलो पावली जीवाश्म दिसतात. वृक्षांची भलीमोठी खोडं जमिनीतून वर डोकावतात. लाकडाचे ओंडके फोडताना लहान-मोठे तुकडे उडून पडावेत तशा लहान-मोठ्या चुईट्या पडलेल्या वाटतात, तर मध्येच भलामोठा ओंडका दर्शन देतो. या सर्वांना हात लावेपर्यंत ते दगड आहेत हे लक्षातच येत नाही. हुबेहूब लाकूड. लाकडावरच्या रेषा, त्यांची रचना, त्यांना असलेल्या गाठी, डाग.. सारं काही जसंच्या तसं दगडात उतरलेलं. पाहताना अचंबित व्हायला होतं. तुमची नजर शोधक असेल तर या लाकडाच्या जीवाश्मांच्या गर्दीत प्राण्यांची जीवाश्म दिसू शकतात. दगडाचा आकार घेतलेलं एखाद्या प्राण्याचं अंडं, हाड किंवा इतर अवशेष.. तोही दगडाच्या रूपात बदलून गेलेला. अर्थात हे तिथंच पाहण्यापुरतं असतं.

M01
हुबेहूब लाकडाचा ओंडका?… नव्हे जीवाश्म.

खरंतर त्या परिसरात अशी अनेक ठिकाणे होती, आजही आहेत. वन विभागाचे लोक किंवा स्थानिक संग्रहकांच्या म्हणण्यानुसार, कित्येक ठिकाणचे अवशेष लोकांनी काढूनही नेलेत. काहींनी खोऱ्यानं उपसले, तर काहींनी ट्रकच्या ट्रक भरून. त्याचा ना हिशेब, ना गणती. अजूनही काही ठिकाणी ते उघड्यावर पडले आहेत. असेच पाय फुटण्याच्या प्रतिक्षेत आहेत. वर्धम या ठिकाणी मात्र वन विभागानं काही अवशेष संरक्षित केलेत. आसपासच्या परिसरालाही संरक्षण देण्याची तयारी केलीय. या जीवाश्मांचा इतिहास अतिशय प्राचीन आणि रंजक. ही जीवाश्म ज्या वृक्षांची आहेत, त्यांचा काळ बराच मागं जातो. काही अभ्यासकांच्या मतानुसार अगदी १३ ते १५ कोटी वर्षांपर्यंत.

M06

प्राण्यांचे जीवाश्म… अंडी, हाडांचे जीवाश्म.

त्या काळात या वनस्पती, प्राणी, जलचर किंवा इतर जीव नद्या, तळी, समुद्र यांच्या गाळात गाडले गेले. त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात गाळ येऊन पडला. त्याचा परिणाम असा की, या सर्व जीवांच्या टणक भागांचा आकार गाळाने घेतला. ही क्रिया अतिशय संथ गतीने होत गेली. पाणी आणि त्यासोबतच्या रसायनांमुळं जीवांचा एकेक कण विरघळून बाहेर पडत गेला. तशी ती जागा गाळातील कणांनी घेतली. त्यामुळे जीवांचा मूळ टणक भाग निघून गेला, पण त्यांचा आकार जसाच्या तसा या गाळाच्या कणांनी घेतला. पुढं या गाळाचं रूपांतर कठीण खडकात झालं. हे खडक पृथ्वीच्या पोटातल्या हालचालींमुळं वर आले आणि जीवाश्मांच्या रूपात आपल्या नजरेला पडले.. आपल्याला दिसलं ते केवळ नमुन्यापुरतं, पण त्याच्या कितीतरी पटीने जीवाश्म पृथ्वीभर वेगवेगळ्या खडकांमध्ये पडून आहेत. त्याची केवळ एक छोटीशी झलक वर्धमला पाहायला मिळते.

M02

पावलोपावली जीवाश्मांचा खजिना..

महाराष्ट्राच्या दृष्टीनं याला अधिक महत्त्व. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा ८५ टक्के भाग बेसॉल्ट नावाच्या अग्निजन्य खडकानं व्यापला आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस थंड होऊन तयार झालेला हा खडक. तिथं अशी जीवाश्म पाहायला मिळत नाहीत. ती मुख्यत: गाळाच्या म्हणजेच स्तरित खडकात पाहायला मिळतात. महाराष्ट्रात असा हा भाग विदर्भात आढळतो. म्हणूनच महाराष्ट्रासाठी ही जीवाश्म वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. वर्धम किंवा गडचिरोलीचं वैशिष्ट्य असं की तिथं वनस्पतींप्रमाणेच माशांचे ठसे, डायनासोर, जलचर आणि इतर प्राण्यांचे जीवाश्मही मिळतात. याच परिसरात पूर्वी डायनासोरच्या मणक्याचे जीवाश्म मिळालेत. त्याच्या विविध भागांचे जीवाश्मही मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. यापैकी डायनासोर कोलकात्याच्या संग्रहालयात आहे, तर बाकी इथल्या-बाहेरच्या हौशींच्या, अभ्यासकांच्या संग्रहात.

असं हे वर्धम. गडचिरोली जिल्ह्याची प्रमुख ओळख ठरू शकेल अशी त्याची क्षमता. तिथं उत्तम संग्रहालय तयार करण्याची योजना आहे. त्यावर कामही झालंय, पण ती पूर्ण होण्यासाठी आणि पुढं विकसित होण्यासाठी आपल्या सर्वांचा पाठिंबा लागेल, काही नाही तर निदान पर्यटक म्हणून तरी!

– अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

 

…डेटॉल डेटॉल हो !

गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू  ‘पचवायची ‘ क्षमता शरीरात निर्माण होते . त्यासाठी ‘हँड सॅनिटायझर ‘चा अट्टाहास  करण्यापेक्षा स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं . सॅनिटायझरवर पैसे परी पैसे जातात, शिवाय रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन अपाय होतो तो वेगळाच. हे प्रकरण इथंच थांबत नाही तर ते वारंवार वापरून त्वचेवरील उपयुक्त जीवाणूंचा थर निघून जातो, त्वचा कोरडी पडते आणि ती बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्याला बळी पडते… तरीही सॅनिटायझरचा सोस कशासाठी?

– अभिजित घोरपडे

hand-sanitizer1

हँड सॅनिटायझर… किती फायद्याचा, किती तोट्याचा?

आमचा इंद्रजीत. वय वर्षे चार. जाहिरातींच्या लयबद्ध ‘झिंगल’ ऐकल्या की टीव्हीकडं धावतो. आयपीएलच्या गेल्या हंगामातल्या ‘…वाह भाई वाह’ या झिंगलनं तर त्याला वेड लावलं होतं. ती गुणगुणत नाचत राहायचा. मग तो आणि मी मिळून त्यातून वेगळी गमतीशीर कडवी रचायचो.. आणि मग मोठ्यानी हसायचो.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका झिंगलनं त्याचं लक्ष वेधून घेतलंय ‘…डेटॉल डेटॉल हो!’ जाहिरातीतली ती लहान मुलं आणि वर ही झिंगल. आजूबाजूला कानोसा घेतल्यावर समजलं की, घराघरातली अनेक लहान मुलं-मुली या झिंगलची फॅन झालीत. शाळेच्या गणवेशातली दोन मुलं. बाहेर आईस्क्रीम घ्यायला हात पुढं करतात. त्यातल्या एकाला आईचे बोल आठवतात- हात धुतल्याशिवाय काही खायचं नाही. मग तो बॅगेतून ‘हँड सॅनिटायझर’ बाहेर काढतो आणि त्याचे चार थेंब हातावर घेऊन हातावर चोळतो. मग आईस्क्रीमवर ताव मारतो.. पार्श्वभूमीवर झिंगल सुरूच असते.

रुग्णालय ते मंगल कार्यालय…

आतापर्यंत फक्त डॉक्टरांकडं असा सॅनिटायझर पाहायला मिळायचा. तेव्हा त्याच्याबद्दल आकर्षणही वाटायचं. पण आता त्याचा प्रसार सर्वत्र झालाय. गेल्याच महिन्यातलं उदाहरण. पुण्यात “शुभारंभ लॉन्स” या मंगल कार्यालयात एका लग्नासाठी गेलो होतो. जेवणाची उत्तम व्यवस्था होती. जेवणाच्या हॉलमध्ये प्रवेश करताच हात धुण्यासाठी पिंप ठेवलेले होते, शिवाय लिक्विड हँडवॉश. हात धुवून ताट घ्यायला गेलो, तर तिथं दोन मुली. मी ताट उचलणार, इतक्यात म्हणाल्या, “एक्सक्यूज मी सर, सॅनिटायझर?” …मी क्षणभर गोंधळलो. मग नकार देऊन ताट उचललं. जेवण संपेपर्यंत मनात विचार होता- च्यायला, हात धुतल्यावर परत सॅनिटायझर कशाला? अजूनही मनाच्या कोपऱ्यात हा प्रश्न कायम आहे.

हे ‘सॅनिटायझर’ प्रकरण अजूनही डोक्यातून गेलेलं नाही. त्यामुळे मुद्दाम काही डॉक्टरांशी बोललो. त्यापैकी एक आमचे वरिष्ठ मित्र. साहित्यिक असलेले आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ. सदानंद बोरसे. ‘जेवणापूर्वी साबणाने हात धुतल्यावर या सॅनिटायझरची काहीही आवश्यकता नाही. जेवढी अति काळजी घ्याल, तितकी रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार हे निश्चित…’ इति डॉ.बोरसे. डॉक्टरांनी रुग्णाला हात लावल्यावर सॅनिटायझर वापरणं ठीक, पण आपण? हा प्रश्न पिच्छा सोडत नव्हता. कारण भविष्यात याचे अनेक परिणाम संभवतात. बाटलीबंद पाणी पिणं हे आता जसं ‘स्टेटस् सिंबॉल’ झालंय, त्याच मार्गावर हे सॅनिटायझर प्रकरण घेऊन जाईल. मग पुढं पाण्याच्या बाटलीबरोबर सॅनिटायझरची बाटलीसुद्धा घेऊन फिरावं लागेल, नाहीतर तुम्हाला मागास ठरवलं जाईल.. या प्रकरणाचे याच्याही पलीकडं गंभीर परिणाम आहेत.

hand-sanitizer3

जीवाणूंशिवाय पोटातील अन्न पचू शकत नाही…

खोटं सांगा, नाहीतर अर्धसत्य सांगा

जाहिराती किती अर्धसत्य किंवा खोटी माहिती ठोकून देतात, याचं हे उत्तम उदाहरण. अशा उत्पादनांच्या जाहिराती बऱ्याचदा तुम्हाला जीवाणूंची (बॅक्टेरिया) भीती घालत असतात. त्यांचा बागूलबुवा उभा करायचा आणि आपली उत्पादनं खपवायची.. हा त्यांचा धंदा. पण जीवाणू आपल्याला जगण्यासाठी किती उपयुक्त ठरतात, हे मात्र बेमालूमपणे लपवून ठेवतात. कल्पना आहे का- आपल्या शरीरावर कुठं-कुठं असतात हे जीवाणू? आणि किती गरजेचे असतात ते? जीवाणू संपूर्ण शरीरावर आणि पोटातसुद्धा ते असतात. इथं सगळीकडं त्रासदायक जीवाणूंपेक्षा उपयुक्त जीवाणूंची संख्या जास्त असते. त्यामुळेच तर आपल्या शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित सुरू राहतात. उदाहरणच द्यायचं तर पोटात जीवाणू नसतील तर आपण खाल्लेल्या अन्नाचा एकही घास पचू शकणार नाही. कारण पचण्याची क्रिया पोटातील जीवाणूंमुळेच पार पडते.. त्वचेवरचे जीवाणूसुद्धा बाहेरच्या वातावरणापासून आपलं संरक्षण करतात. हे वास्तव असताना जाहिराती आपल्या माथी काय मारतात?.. तर आहेत नाहीत ते जीवाणू मारून टाका!

सॅनिटायझरचा उपयोग काही प्रमाणात निश्चित आहे, पण तो काही प्रमाणातच. संसर्गजन्य आजाराची साथ पसरलेली असताना बाहेर हात धुण्याची सोय नसेल तर तो काही प्रमाणात नक्कीच उपयुक्त ठरतो. तसेच, अशा रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांसाठीही तो उपयोगाचा आहे, पण तो तेवढ्यापुरताच. त्याची सर्रास सवय लावून घेणं घातक आहे. स्पर्श केल्याने होणारा संसर्ग सॅनिटायझरमुळे टाळता येतो, पण शिंकल्यावर, खोकल्यावर किंवा इतर कारणाने हवेतून पसरणारा संसर्ग तो रोखू शकत नाही. ही त्याची मर्यादा लक्षात घ्यायला हवी. त्याचे थेट अपायही आहेत. अमेरिकेच्या ‘फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’ने सॅनिटायझरच्या उपयुक्ततेबाबत शंका घेतल्या आहेत आणि कंपन्यांना त्यांची उपयुक्तता सिद्ध करण्यास सांगितले आहे. सॅनिटायझर वारंवार वापरणे हे त्वचेसाठी घातक आहे, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. ( https://www.webmd.com/cold-and-flu/news/20160629/fda-asks-how-safe-is-that-hand-sanitizer )

सॅनिटायझरमुळे जीवाणू का मरतात?

सॅनिटायझरमध्ये असलेलं अल्कोहोल हे जीवाणू मारण्याचं कार्य सिद्धिस नेतं. आपण साबण आणि पाण्याने हात धुतो तेव्हा जीवाणू मरतात आणि ते पाण्यासोबत वाहून जातात. सॅनिटायझरच्या पद्धतीत मात्र अल्कोहोल त्वचेवरच थांबून राहतं. त्याचं बाष्पीभवन होतं, त्यावेळी हातावरील जीवाणू मारते जातात.  त्यासाठी सॅनिटायझरमध्ये किमान ६० टक्के अल्कोहोल असावं लागतं.

सॅनिटायझरमुळे नेमकं काय-काय होतं?

सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे त्वचा कोरडी पडते. नैसर्गिक तेल निघून जाते. सॅनिटायझरच्या वारंवार वापरामुळे त्वचेचे नैसर्गिक संरक्षणच निघून जाते. त्यामुळे कालांतराने आपले शरीर बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्यासाठी अधिक प्रवण बनते. सॅनिटायझरमध्ये सुगंधासाठी कोणती रसायने वापरली जातात हे अनेकदा बाटलीवर लिहले जात नाही. त्याची अॅलर्जी येऊ शकते, ती त्रासदायक ठरू शकतात. हे सॅनिटायझर किती प्रमाणात वापरावं हे लहान मुलांना समजत नाही. ‘स्वच्छता, अधिक स्वच्छता…’ या हेतूने ते भसाभस वापरलं की त्याच्यामुळे होणारा त्रास आणखी वाढतो. ( https://www.annmariegianni.com/why-you-should-avoid-hand-sanitizer/ )

Staphylococcus aureauMagnification 20,000

त्वचेवर आणि शरीरात उपयुक्त जीवाणूंची संख्या नेहमीच जास्त असते..

याच्याही पुढं जाऊन माझा नेहमीचा मुद्दा म्हणजे- आपण किती नाजूक व्हायचं हे ठरवायला हवं. गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू ‘पचवायची’ क्षमता शरीरात निर्माण होते ना. आणि स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं की. मग कशाला हा अट्टाहास? या उत्पादनांवर पैसे गेल्याचं दु:ख आहेच, शिवाय रोगप्रतिकारकक्षमता कमी होऊन अपाय होतो ते वेगळाच.
असा काळ सोकावू द्यायचा का, हाच आपल्यासारख्या सूज्ञ जनांपुढचा प्रश्न आहे. ‘जाऊ द्या ना, त्यात काय एवढं..’ असं म्हणून हे वापरायला लागलो तर उद्या कदाचित काळ माफ करणार नाही..
एवढंच!!!

– अभिजित घोरपडे
abhighorpade@gmail.com

(या लेखात वापरलेले ‘डेटॉल’ हे उत्पादनाचे नाव प्रातिनिधिक आहे, हे मुद्दे अशा प्रकारच्या सर्वच उत्पादनांना लागू होतात.)

 

या मातीखाली दडलंय काय? (सांगलीच्या पेवांची कथा, भाग २)

हळदीची पेवं सांगलीजवळ असलेल्या हरीपूरलाच का?.. याचं उत्तर सांगलीची बाजारपेठ आणि हरीपूरमधील मातीच्या थरांमध्ये दडलं आहे. मातीचे वैशिष्ट्यपूर्ण थर नसते तर तिथं पेवं खणताच आली नसती आणि त्यात हळदही टिकली नसती. एरवी मातीकडं कोणी लक्ष देईल न देईल, पण इथं मातीनंच हळद साठवण्याला पूरक परिस्थिती निर्माण करून दिली आणि सांगलीची बाजारपेठ विस्तारण्यास हातभारही लावला.

या पेवांची दुनियाच न्यारी आहे. कारण त्यात हळदीला कीड लागत नाही, साठवलेल्या हळदीचं वजन वाढतं आणि त्यातल्या हळदीची चोरीही होऊ शकत नाही

अभिजित घोरपडे

P9a

पेवाचं तोंड, आढी आणि झाकण

 

 

हळद साठवण्याची पेवं पाहताना मला पडलेला एक प्रश्नही पेवं हरिपुरातच का? एक गोष्ट स्पष्टच होती. हळदीची देशातली सर्वांत मोठी उलाढाल सांगलीला व्हायची, आजही होते. त्याच्या जवळ असल्यामुळे हरीपूर महत्त्वाचं. पण हे एकच कारण पुरेसं नाही. कारण तसं असतं तर मग खुद्द सांगलीत किंवा आसपासच्या इतर गावांमध्ये पेवं का नाहीत? अगदी कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या इतर गावांमध्ये अशी पेवं का नाहीत?.. ती फक्त हरीपुरातच का?

याचा संबंध तिथल्या नैसर्गिक घटकांशीही असणार हे निश्चित. तो नेमका काय आणि कसा? याचा शोध घेताना मजा आली, बरंही वाटलं. बरं वाटण्याचं कारण म्हणजेत्याच्याशी तिथल्या मातीच्या थरांचा संबंध असल्याचं ऐकायला मिळालं, पाहायलाही मिळालं. मी भूशास्त्राचा विद्यार्थी. म्हणूनच त्याच्याशी मातीचा संबंध असल्याचे पाहून आनंद झाला. इथल्या मातीचा या दृष्टीने विशेष अभ्यास झालाय, असं नाही. पण तिथले लोक पेवांची माहिती देतात, त्यावरून निश्चितपणे काही अंदाज बांधता येतात, ढोबळ निष्कर्षही काढता येतात.

पेवांसाठी मातीमध्ये तीन गुणधर्म असावे लागतील

 • त्या मातीत पेवं व्यवस्थित कोरता यावीत.
 • पेव कोरल्यावर ती ढासळायला नकोत. त्यासाठी माती तितकी धरून ठेवणारी असावी.
 • त्यात ठेवलेली हळद टिकून राहायला हवी. त्यात पाणी झिरपायला नको, ओल यायला नको.

हरीपूरमधील मातीचे थर हे निकष पूर्ण करतात. त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात पेवं आहेत आणि ती इतक्या वर्षांनंतरही टिकून आहेत. हरीपूरमध्ये अनेकांशी या विषयावर बोललो. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की ही माती हे सर्व निकष पूर्ण करणारी आहे. हरीपूरला असलेल्या मातीचे थर साधारणपणे असे आहेत

 • सर्वांत वरती साधारणत: पाचसात फूट जाडीचा काळ्या मातीचा थर.
 • त्याच्या खाली सुमारे तीस ते सत्तर फुटांपर्यंत वैशिष्ट्यपूर्ण थर आहे. तो माण माती, चिकनी माती, चिकण माती, लाल मातीअशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.
 • याच्या खाली वाळूचा थर आणि
 • सर्वांत खाली शेवटी काळा खडक.

या थरांपैकी सर्वांत महत्त्वाचा आहे, माण मातीचा / चिकनी मातीचा थर. याचं वैशिष्ट्य असं की,

. त्यात हवं तसं कोरता येतं. बाजूची माती ढासळत नाही. टिकावाने किंवा कुदळीने मातीचा जेवढा भाग काढू, तेवढाच निघतो. बाजूचा भाग हलत नाही, पडत नाही. त्यामुळे त्यात पेवं खणणं सोपं जातं.

. हा मातीचा थर बरंच वजन पेलू शकतो. म्हणून तर आत पोकळी असली तरी पेवं ढासळत नाहीत. या पेवांमध्ये हळदीची पोती भरण्यासाठी तिथपर्यंत भरलेले ट्रक आणावे लागतात. इतकं वजन पेलून धरण्याची या मातीची क्षमता आहे. त्यामुळे पेवं ढासळत नाहीत.

. या मातीतून पाणी पाझरत नाही. त्यामुळे आतल्या हळदीला ओल लागत नाही. ती व्यवस्थित राहते.

P10a

पेवाची सर्वसाधारण रचना

पेवांची रचना :

या पेवांच्या रचनेवर सांगलीच्या दिलीप ट्रेडर्सचे दिलीप मालू यांनी प्रकाश टाकला. हरीपूरचे राजाभाऊ आळवेवर यांनीही त्यांची रचना समजावून दिली.

 • सर्वांत वरती चारसहा फुटांच्या थरात पेवाचं तोंड असतं. सरळ उभट तोंड. ते सर्व बाजूंनी विटांनी बांधून घेतलं जातं.
 • त्याच्या खाली या तोंडापेक्षा थोडा कमी व्यासाचा मार्ग असतो. तिथं आढी बांधतात. या ठिकाणी पेवाचं झाकण असतं. आढी म्हणजे खाली थोडंसं विटांचं बांधकाम, त्याच्यावर लोखंडी पट्ट्या आणि त्या पट्ट्यांवर पेवाचं झाकण बसवलं जातं. झाकण असतं आयताकृती शहाबादी फरशीचं. ती बसवली की वर माती टाकून तोंड बुजवून टाकतात.

पेवाचं तोंड साधारणपणे वरचा साधा काळ्या मातीचा थर आणि खालचा चिकण मातीचा थर यांच्या सीमेवर असतं. तोंडाच्या खाली हंड्याच्या आकाराची मोठी पोकळी केलेली असते. ती पूर्णपणे चिकण मातीच्या थरात असते. त्याची उंची साधारणपणे २० ते २५ फुटांपर्यंत असते.

पेवाचा व्यास १५२० फुटांपर्यंत असतो राजाभाऊ आळवेकर यांनी वर्णन केलं. पण मी प्रत्यक्ष काही पेवांमध्ये डोकावलं तेव्हा त्यांचा व्यास १२ फुटांच्या आसपास असावा असं वाटलं. दोन पेवांमध्ये काही फुटांचं अंतर असतं. हरीपूरची पेवं पाहिल्यावर ते तीनचार फूट असावं, असं जाणवलं.

पेवाचं तोंड भरून घेतल्यानंतर ते कुठं आहे हे ओळखू यावं म्हणून वर मातीचा ढिगारा करतात. या ढिगाऱ्यावर बँकेची प्लेट रोवलेली असते. ज्या बँकेने पेव तारण ठेवून कर्ज दिलेलं असेल, त्या बँकेची ती प्लेट.

 

p11

पेवाच्या तोंडावर बँकेची प्लेट

पेवात हळद भरण्याची पद्धत :

पेवं ही एक स्वतंत्र संस्कृती होती, अजूनही आहे. त्यामुळे तिथं लोकांनी पेवांशी संबंधित कामं, कौशल्य आत्मसात करून घेतली होती. त्यातलंच एक काम म्हणजे पेवं भरणं. पेवं भरण्याची पद्धत सविस्तर वर्णन करण्याजोगी आहे. थोडक्यात सांगायचं तर,

तळाशी शेणकुटं टाकतात.

त्याच्यावर शिंदीच्या पानांपासून तयार केलेल्या चटया अंथरतात.

पेवात कडेला उसाच्या वाड्याच्या वाळलेल्या पेंड्या लावतात.

मग मधल्या भागात हळदीची पोती ठेवतात. पोती ठेवत ठेवत कडेच्या उसाच्या पेंड्यांचा थर वाढवत नेतात.

पेवाच्या झाकणापासून खाली पाच फुटांचा थर मोकळा ठेवला जातो. त्याच्या खालपर्यंतच हळदीची पोती ठेवली जातात. एका नियमित आकाराच्या पेवात साधारणत: १५० ते २०० क्विंटल इतकी हळद मावते.

दिलीप मालू यांच्यानुसार, पेवांमध्ये हळद व्यवस्थित टिकते. कडेला असलेल्या हळदीला थोडी फार बुरशी लागलेली दिसते, पण त्याचं प्रमाण अगदीच नगण्य असतं.

P12

पेवात हळद साठवण्याचे फायदे :

हळद पेवातच का साठवायची, याचीही कारणं आहेत. त्याच्यामुळे हळदीचं संरक्षण होतंच, शिवाय तिचा दर्जाही सुधारतो, असं तिथल्यालोकांनी सांगतलं.

हरीपूरचे वसंत गोविंद आळवेकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

. पेवातल्या हळदीला कीड लागत नाही, कारण पेवात ऑक्सिजन नसतो. त्यामुळे तिथं कोणताही कीटक तिथं जगू शकत नाही.

. या हळदीची चोरी होत नाही, ती सुरक्षित राहते. कारण पेव खणून हळद चोरणं हे सोपं काम नाही. दुसरं म्हणजे पेवात ऑक्सिजन नसतो. त्यात हवा खेळण्यासाठी आणि ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत होण्यासाठी साधारणत: सोळाअठरा तास लागतात.

एखादं पेव दुपारी बाराच्या सुमारास पेव उघडलं की त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास त्यात हवा खेळलेली आणि पुरेसा ऑक्सिजन जमा झाल्याचं पाहायला मिळतं. त्यासाठी त्यात कंदील सोडला जातो. त्याची ज्योत टिकली की मगच माणसं आत उतरतात. तोपर्यंत कोणी आत जाऊ शकत नाही, गेलंच तर ऑक्सिजनअभावी त्याचा मृत्यू ओढावतो.

. पेवात हळद साठवल्यावर तिचा रंग सुधारतो, तो अधिक पिवळा धमक होतो. त्यांच्या हिशेबानुसार २५३० टक्के पिवळेपणा वाढतो.

. पेवात साठवल्यावर हळदीचं वजन वाढतं. याबाबत ९५ वर्षांचे गोविंद आळवेवर यांनी सांगितलं की, पेवात ठेवल्यावर पोत्याचं (१०० किलोच्या) वजन १०६ किलो इतकं भरतं.

हे असं वजन का वाढतं? हा प्रश्न माझ्या मनात होता, अजूनही आहे. वसंत आळवेकर यांनी सांगितले की, पेवात चांगलीच उष्णता असते. त्याच्यामुळे हळद फुगते, तिचं वजन वाढतं.

…हे झाले लोकांचे अनुभव, लोकांची माहिची! पण तरीही काही रहस्यं आणि प्रश्न कायम राहतात- हळदीचं वजन वाढणं, पिवळेपणा वाढणं, ऑक्सिजन नष्ट होणं आणि महत्त्वाचं म्हणजे तिथल्या मातीच्या थरात नेमकं काय दडलंय?… त्यासाठी पुन्हा पुन्हा पेवांची माहिती घ्यावीच लागते.

(क्रमश:)

– अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार / फेलो (पर्यावरण व शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

(“पेवं म्हणजे संपन्नता” : पेवांचं अर्थकारण… वाचा पुढच्या भागात)

सांगलीच्या पेवांची कथा… (भाग १)

सांगलीची हळद देशभर प्रसिद्ध. ही हळद साठवण्यासाठी तिथं पेवं होती, अजूनही आहेत. सांगलीत हळदीचा व्यापार वाढला, तसं शेजारच्या हरिपुरात पेवांचं पेव फुटलं. पेवांनी हरिपूरला वेगळी ओळख दिली, पैसा दिला. ‘पेवं म्हणजे समृद्धी’ हे जणू सूत्रच होतं. कृष्णाकाठच्या मातीचे वैशिष्ट्यपूर्ण थर, सांगलीचा शेजार यामुळे ही पेवं वाढली. पण २००५ साली कृष्णेला आलेल्या पुरात बहुतांश पेवं बुडाली. या पुराचा आघात इतका मोठा होता की, तेव्हापासून पेवांची घडी विस्कटली ती कायमचीच. आता बदलत्या काळात ही घडी पुन्हा बसणं महाकठीण. त्यामुळे हळूहळू पेवांचं स्थान आठवणींमध्येच उरण्याची शक्यता अधिक. याच पेवांची वेगळ्या अंगानं ओळख करून देण्यासाठी ही छोटीशी मालिका…

अभिजित घोरपडे

P7

खोल खोल पेवं !

महाराष्ट्राच्या काही भागाने नुकताच पुराचा अनुभव घेतला. जुलैऑगस्ट महिन्यांचं हे वैशिष्ट्यच. सर्वाधिक पावसाचा काळ. धरणं भरत आलेली असतात. पडेल तो पाऊस सोडून द्यावा लागतो. मग अनेक भागात पुराची शक्यता निर्माण होते. कधी अतिवृष्टी झाली तर दाणादाणसुद्धा. पावसाच्या अशा अनेक आठवणी आहेत. दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या. दोन वर्षांपूर्वी दरडींखाली गुडूप झालेलं माळीण गाव.. या वर्षी महाडजवळ कोसळलेला सावित्रीवरचा पूल.. शीच एक कहाणी २००५ सालची. त्या वर्षी २६ जुलै रोजी मुंबईने प्रलय अनुभवला, तसाच तो महाराष्ट्राच्या अनेक भागांनीही अनुभवला. कोकणात चार-पाच गावांवर दरडी कोसळल्या. शंभरावर लोकांचा मृत्यू झाला. त्या वर्षी एकाच वेळी राज्याचा निम्मा भाग पुराने वेढला गेला होता. सांगली-कोल्हापूर या जिल्ह्यांना तर पुराचा अभूतपूर्व विळखा पडला. या पुराने शेतीचं, आर्थिक नुकसान तर केलंच. त्याच्या बरोबरीनेच व्यापक बदल घडवले. अनेक ठिकाणची वैशिष्ट्यं संपवली. त्यातला एक बदल सांगलीच्या दृष्टीनं दूरगामी आणि या शहराची ओळख हिरावून घेणारा ठरला. कारण या पुरामुळं सांगलीची वैशिष्ट्यपूर्ण “पेवं” नष्ट झाली. त्या महापुराला आता अकरा वर्षं होतील, पण सांगलीच्या पेवांची घडी विस्कटली ती कायमचीच. सांगलीची ही महत्त्वाची ओळख हळूहळू विसरू लागलीय. विस्मरणात चाललेल्या पेवांच्या दुनियेत पावसाच्या निमित्तानं डोकावायला हवं

P8

पिवळीधमक हळद / हळकुंडं… सांगलीची ओळख

हरिपूरची ओळख

माझं पेवांबद्दलचं आकर्षण बरंच जुनं, पण ती पाहायला मिळाली दोन वर्षांपूर्वी. सांगली मुक्कामात तिथल्या प्रसिद्ध हळदीबद्दल माहिती घेत होतो. वेगवेगळ्या भागात मातीपाणीहवामान याचा हळदीवर, तिच्या दर्जावर काय परिणाम होतो, हे समजून घ्यायचं होतं. तिथले एक व्यापारी दिलीप मालू यांच्याशी बोलताना पेवांचा विषय निघाला. त्यांनी पेवांबाबत सांगितलेली माहिती इतकी रंजक होती की लगोलग दुसऱ्याच दिवशी पेवांच्या गावात प्रवेश केला. गावाचं नावहरिपूर. कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या संगमाचं गाव. सांगलीला लागूनच. वस्ती साधारण ६००० ते ६५००. हळदीसाठी सांगली प्रसिद्ध, तर हळकुंडं साठवण्यासाठीची पेवं ही हरिपूरची ओळख!

पेवं हा शब्द ऐकला असेल, पण पेवं म्हणजे नेमकी काय? हे पाहिल्याशिवाय समजत नाही. मलासुद्धा ती पाहिल्यावरच स्पष्टता आली. समज-गैरसमजही गळून पडले. पेव म्हणजे जमिनीत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं तयार केलेली पोकळी. माती उकरून ती तयार केली जाते. आकार साधारण गोलाकार. त्यात धान्य, शेतीमाल साठवला जातो. इथल्या पेवांचा मुख्य उद्देश हळकुंडं साठवणं. ती पेवात चांगली टिकतात. हळदीचा दर्जा सुधारतो. शिवाय इतर साठवण्याच्या पद्धतीपेक्षा खूपच किफायतशीर. त्यामुळे पेवं वाढली. एकेका पेवात १५ टन ते २५ टन इतकी हळकुंडं मावतात. व्यवस्थित राहतात. त्यामुळे व्यापारी मंडळी हळद (हळकुंडं) पेवात साठवायचे. ही पेवं मात्र हरिपूरच्या लोकांची. आता परिस्थिती बदललीय. तरीही पेवं तग धरून आहेत. पेवं आणि हरीपूर यांचा घट्ट संबंध. अगदी थेट. ती तशी इतरत्रही पाहायला मिळतात, पण इथली पेवं वैशिष्ट्यपूर्ण. म्हणून पेवं म्हटलं की याच गावाचं नाव घेतलं जातं. हळदीसाठी प्रसिद्ध असलेली पेवं फक्त इथलीच. याचा संबंध इथल्या मातीशी, तिच्या थरांशी आहे.

P3

पेवांसाठी मैदानं… मुक्काम पोस्ट- हरिपूर.

पेवांची दुनिया

पेवांची दुनिया समजून घेण्यासाठी अनेकांना भेटलो, बोललो. ज्यांची आजही पेवं आहेत ते अशोक मोहिते, याच गावचे राजाभाऊ आळवेकर, अशोक तेलंग, वयाची शंभरी गाठत आलेले गोविंद नारायण ऊर्फ अण्णा आळवेकर, सांगलीतील दिलीप ट्रेडर्सचे दिलीप मालू, असे बरेच जणहरिपुरात गेल्यावर एक वैशिष्ट्य जाणवलं. या गावात मैदानंच मैदानं. गावठाणात, आजूबाजूला. सगळीकडंच मैदानं. मुद्दामच राखलेली. ही सारी पेवांची मैदानंबोंद्रे मैदान, पिंगळे मैदान, फाकडे मैदान, कत्ते मैदान, हनवर मैदानअशी कितीतरीफाकडे मैदानात दोन एकरावर नारायण बजरंग फाकडे यांची १००-१५० पेवं असल्याचं समजलं. अंकली रस्त्यावर बोंद्रे मैदानातली पेवं चांगल्या प्रकारे राखलेली होती. या मोठ्या मैदानात पेवाच्या ८ ओळी मोजल्या. एका एळीत १० पेवं होती. अशी एकूण ८० पेवं होती. त्यालाच लागून असलेल्या लहान मैदानात ५० पेवं होती.

ही सर्व पेवं जुनी. अलीकडच्या २५२७ वर्षांत नव्यानं पेवं काढली नाहीत. पण या पेवांचा काळ नेमका किती मागं जातो, हे अधिकारवाणीने कोणी सांगू शकलं नाही. पेवांचे मालक असलेले अशोक मोहिते यांच्या म्हणण्यानुसार, पेशवाईपासून घरात पेवं होती. कारण तितक्या जुन्या वाड्यांमध्ये आजही पेवं पाहायला मिळतात. पुढे १९३५ नंतर त्यांची संख्या वाढत गेली.

पेवांबाबत जुनी माहिती मिळवण्यासाठी गावातील वयोवृद्ध गृहस्त गोविंद नारायण आळवेकर ऊर्फ अण्णा यांना भेटलो. जन्म१९२०. त्यांच्या घरी गेलो. नेहरू शर्ट, धोतर, डोक्यावर पिवळसर फेटा, कपाळावर चंदनाचा टिळा. दृष्टी व्यवस्थित, आवाजही उत्तम, मात्र ऐकायला कमी येत होतं. पन्नाशीत असलेल्या आपल्या मुलाचा (वसंत) हात धरून बाहेरच्या खोलीत आले. नमस्कार केला, तर ते माझ्या पाया पडण्यासाठी वाकलेते वारकरी संप्रदायाचे असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं.

Pe

श्री. अण्णा आळवेकर. जन्म- १९२०

आजपर्यंतचा प्रवास

अण्णांनी हरिपुरात लहानपणीपासून पेवं पाहिलीत. “ती आधी धान्य साठवण्यासाठी वापरली जायची. हळदीची बाजारपेठ वाढली, तशी पेवांची संख्याही वाढत गेली. आधी पेवं घरातच असायची. ती फार मोठी नव्हती. त्यात २५-५० पोती धान्य मावायचं. अनेकांच्या घरात आजही पेवं आहेत. पुढं पेवांची संख्या वाढली, तशी ती अंगणात गेली. १९३५ नंतर हळदीचं उत्पादन वाढलं, सांगलीत हळदीची बाजारपेठही विस्तारली. व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात हळद साठवण्याची गरज निर्माण झाली. मागणी आणखी वाढल्यावर लोकांनी शेतातही पेवं काढली. पेवांकडं उत्पन्नाचं चांगलं साधन म्हणून पाहिलं जाऊ लागलं…” अण्णांनी बराच जुना पट उलगडून दाखवला. “१९७५ ते २००५ हा कालावधी हळदीच्या पेवांसाठी अतिशय लाभदायक. सुवर्णकाळच म्हणा...” अण्णांचे चिरंजीव वसंत आळवेकर यांनी माहितीत भर टाकली. “३० वर्षांपूर्वी पेवं काढायला तीन हजार रुपये खर्च यायचा…” हरिपुरात भेटलेले ७४ वर्षांचे श्रीपती केदारी जाधव यांनी ही माहिती दिली.

एकट्या हरीपुरात ४५००-५००० पेवं होती, असं गावातील राजाभाऊ आळवेकर यांनी सांगितलं. “२००५ च्या पुरात हरिपुरातली निम्मी पेवं गेली. पुरामुळे पेवं पाण्याखाली गेली. पाणी आत शिरल्याने स्फोट झाल्यासारखी पेवं उडाली. पेवं अशी फुटायची, त्याचा मोठा आवाज व्हायचा, मग तिथं पाणी शिरून पाण्याचा भोवरा व्हायचा. कदाचित आत साठून राहणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूचा तो परिणाम असावा… या पुरात हरिपूरची निम्मी पेवं संपलीराजाभाऊ यांची आठवण. “या पुरामुळे सांगलीतील हळदीच्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. ते सहाआठ वर्षे मागं फेकले गेले..” हळदीचे व्यापारी दिलीप मालू यांची आठवण. सध्या हरीपुरात २०००२५०० पेवं असल्याचं सर्वांच्याच बोलण्यात आलं.

आकर्षक रचना

पेवांची रचना आवडली- जणू एखादा रांजणच. वरच्या बाजूला चार-सहा फूट सरळ उभट तोंड. ते विटांनी बांधून घेतलं जातं.

त्याच्या खाली या तोंडापेक्षा थोडा कमी व्यासाचा मार्ग असतो. तिथं आढी बांधतात. या ठिकाणी पेवाचं झाकण असतं. खाली थोडंसं विटांचं बांधकाम, त्याच्यावर लोखंडी पट्ट्या आणि त्या पट्ट्यांवर पेवाचं झाकण बसवलं जातं. झाकण म्हणजे आयताकृती शहाबादी फरशी. ती बसवली की वर माती टाकून तोंड बंद करून टाकतातपेवाचं तोंड हे मातीच्या विशिष्ट थरात असतं. साधारणपणे वरचा काळ्या मातीचा थर आणि खालचा चिकण मातीचा थर यांच्या सीमेवरच तोंड असतं.

या तोंडाच्या खाली हंड्याच्या आकाराची मोठी पोकळी. ती पूर्णपणे चिकण मातीच्या थरात असते. त्याची उंची साधारणपणे २० ते २५ फुटांपर्यंत असतेव्यास १५२० फुटांपर्यंत असतो… राजाभाऊ आळवेकर यांनी सांगितलेली ही माहिची. पण मी विविध मैदानात वरूनच पेवं पाहिली, तेव्हा पेवांचा व्यास १२ फुटांच्या आसपास असावा, असं वाटलंदोन पेवांमध्ये तीनचार फूट असावं, असं दिसून आलं.

पेवाचं तोंड बंद केल्यावर ते नेमकं कुठं आहे, हे ओळखू यावं यासाठी तिथं मातीचा ढिगारा करतात. या ढिगाऱ्यावर बँकेची प्लेट दिसली. ज्या बँकेने पेव तारण ठेवून कर्ज दिलेलं असेल त्या बँकेची ही प्लेट. (क्रमश:)

– अभिजित घोरपडे

ई-मेल : abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार

फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

संपादक, भवताल मॅगझीन

(पेवं हरिपूरलाच का.. असं काय दडलंय तिथल्या मातीत..?

वाचा- “सांगलीच्या पेवांची कथा, भाग २”… लवकरच याच ब्लॉगवर)

 

एक होतं मधमाशीचं पोळं!

मी राहतो ती सोसायटी. एका इमारतीला लागलेलं आग्या मोहोळ रसायनं फवारून काढण्यात आलं. त्यात तीस हजार ते पन्नास हजार मधमाशा मेल्या. एकीकडं, मधमाशांमुळं पिकांचं उत्पादन वाढत असल्याचं जातं. भारतासह जगभर मधमाशा जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. त्याच वेळी आपण हजारो मधमाशा सहज मारून टाकतो. केवढा हा विरोधाभास!… आपल्या जगण्यातील गुंतागुतीचं हे उदाहरण. शहरांची वाढ होताना वनांच्या आणि शेतीच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. अनेक परिसंस्था कळत न कळत नष्ट होत आहेत. त्यात जगणाऱ्या असंख्य वन्य प्रजातींशीजीवांशी कसं वागायचं आणि त्यांचं नेमकं काय करायचं, हे आपल्यापुढचं मोठं आव्हान आहे. प्रामाणिकपणे कबुली द्यावी लागेल, अजून तरी आपण ते पेलायला समर्थ बनलेलो नाही.

अभिजित घोरपडे

Bee1

मधमाशी… बहुगुणी की त्रासदायक???

रात्री साडेदहाअकराची वेळ असेल. लिफ्टने नवव्या मजल्यावर गेलो. बाहेर पडलो, तर समोर मेलेल्या मधमाशांचा खच. मोठ्या आकाराच्या. शेकडोच्या संख्येनं. जवळजवळ सगळ्या शांत झालेल्या. अगदी मोजक्याच क्षीण फडफड करत होत्या. “इतक्या मधमाशा?” मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं. जिन्यात गेलो. तर तिथंही माशा. वरच्या, खालच्या मजल्यांच्या व्हरांड्यातही तेच चित्र. शेकडो माशा मरून पडलेल्या. उग्र वासही येत होता.

घरी विचारल्यावर समजलंसातव्या मजल्यावर गच्चीत आग्या मोहोळ होतं. मेंटेनन्सच्या लोकांनी सायंकाळी दारंखिडक्या बंद करायला सांगितल्या आणि ते काढलं. ते कशाप्रकारे काढलं असावं, याचा अंदाज आला. दुसऱ्या दिवशी माहिती घेतली त अंदाज खरा ठरला. पोळ्यावर रासायनिक पदार्थ फवारला होता. त्यात हजारो माशा मेल्या. सातव्या मजल्यावरच्या गच्चीत तर माशांचा खच पडला होता. वरती पोळ्यालाही काही माशा तशाच चिकटलेल्या होत्या. काही दिवसांनी संपूर्ण पोळं खाली आलं. एका परीपूर्ण पोळ्यात सुमारे तीस हजार ते पन्नास हजार मधमाशा असतात. एकदोन दिवसांत तेवढ्या माशांचा जीव गेलाएखाद्या संवेदनशील व्यक्तीला किंवा निसर्गात मधमाशांचं स्थान माहीत असलेल्या माणसाला अस्वस्थ करणारं हे वास्तव!

Bee2 (1)

हजारो माशा मेल्यानंतर पोळं काही दिवस तिथंच लटकत होतं.

मधमाशी ही निसर्गचक्रातली अतिशय महत्त्वाची कडी आहे. त्यांची संख्या कमी होणं ही सध्याची जगभरातील एक सर्वांत मोठी समस्या. हे असंच सुरू राहिलं तर पिकांचं उत्पादन कमी होऊन कोट्यवधी लोकांवर उपासमारीची वेळ येईल, असा इशाराच शास्त्रज्ञांनी दिला आहे. एक मधमाशी दररोज किमान दोन हजार ते पाच हजार फुलांवर जाते. तिच्यामुळे परागीभवन (pollination) होतं, ते फलधारणेसाठी उपयुक्त ठरतं. पुण्याजवळील तळेगाव येथील मधमाशीपालक व अभ्यासक विजय महाजन सांगतात, मधमाशांमुळं पिकांचं उत्पादन ३५ टक्क्यांपर्यंत वाढतं. डाळिंबाच्या बागांसाठी त्या इतक्या महत्त्वाच्या असतात की, त्यांच्याविना डाळिंबाच्या झाडाला फळ लागतच नाहीत, फुलं तशीच गळून पडतात.. त्यामुळे भारतासह जगभर मधमाशा जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपण मात्र एका वेळेस हजारो मधमाशा मारून टाकतो… केवढा हा विरोधाभास!

आपल्या जगण्यातील ही सर्वांत मोठी गुंतागुत. आपलं “पर्यावरणपूरक जगणंहे फक्त बोलण्यापुरतंत्याचा नेमका अर्थ मात्र माहीत नसतो. घराला हिरव्या रंगाची छटा, कुंडीत काही रोपं, चिमणीसाठी तयार घरटं आणि काचेच्या भांड्यात पाळलेले मासे याच्यापलीकडं हा अर्थ आहे. पण म्हणून गच्चीमध्ये आग्या मोहोळ राहू द्यायचं, असं नक्कीच नाही. मात्र ते काढायचं असेल तर कसं काढावं, हे माहीत करून घ्यायलाच हवं. शहरांची वाढ होत असताना वनांच्या आणि शेतीच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. अनेक परिसंस्था कळत न कळत नष्ट होत आहेत. त्यात जगणाऱ्या असंख्य वन्य प्रजातींशीजीवांशी कसं वागायचं, त्यांचं नेमकं काय करायचं हा कळीचा मुद्दा. ही संख्या बरीच मोठी आहे. वेगवेगळ्या प्रकारचं गवत, रानफुलं, मुंगळे, वाळवी, मधमाशा, चतूरनाकतोडे, बेडूक, सरडे, साप, गोगलगाया, मासे, खेकड्यांपासून ते चिचुंद्री, ससा, खार, घुबड, कावळा, राघू, कोतवाल, वटवाघळंअशी ती लांबतच जाते. आपली अडचण अशी आहे की आताच्या, शहरी राहणीमानात आपण यांना पूर्णपणे सामावून घेऊ शकत नाही. तरीही काही अंतरावर का होईना, परिसरात त्यांचं अस्तित्व आवश्यक आहे. पण त्यांच्याशी जुळवून कसं आणि किती घ्यायचं, हा आजचा मोठा प्रश्न आहे.

Bee2 (3)

मेलेल्या मधमाशा झाडून एका बाजूला लावल्या होत्या.

त्याची उत्तरं शोधताना दोन्ही टोकाला जाणं योग्य नाही, ते परवडणारंही नाही. कारण इतकं पुढं आल्यावर आता पुन्हा मागं निसर्गाकडं चला, हे म्हणणं व्यवहार्य नाही. त्याच वेळी हवं कशाला हे सारं, ही मांडणीही परवडणारी नाही. कारण हेच सारे परिसर काही प्रमाणात स्वच्छ, शुद्ध करतात. त्यांच्यामुळे परिसराला जिवंतपणा मिळतो. शिवाय जैव विविधता जोपासली जाते, हाही फायदा.

आताच्या या गुंतागुंतीच्या काळात आंधळेपणाने पर्यावरण, पर्यावरण असं करून भागणार नाही. त्याच्या घटकांसोबत जगताना नेमके काय प्रश्न उद्भवतात, हे मधमाशीच्या पोळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळालंच. त्यातून मार्ग कसा काढता येईल, हे आता पाहायला हवं. आपल्यापुढचं हेच मोठं आव्हान आहे. आपण साऱ्यांनी मिळून त्याला भिडावंच लागेल. कारण याच छोट्या छोट्या गोष्टींतून खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक कसं जगायचं, हे कळून चुकेल.

(मधमाशांची पोळी काढण्याचा एक उत्तम मार्ग आहे. काही जण रसायनं न वापरता पोळं व्यवस्थित काढतात. विशिष्ट वनस्पतिंची धुरी देऊन मधमाशांना काही काळासाठी भुलवलं जातं आणि पोळं काढून घेतलं जातं. मग पोळ्याच्या ठिकाणी विशिष्ट लेप लावला जातो. त्यामुळे माशा काही काळासाठी घोंगावतात, आणि तिथून निघून जातात. या पद्धतीत माशा मरत नाहीत. हाताळणीत काही चुका झाल्या तरी मरणाऱ्या माशांची संख्या फारच कमी असते. अंडी आणि न उडू न शकणारी पिल्लं मात्र मरतातरसायन फवारून तीस हजार ते पन्नास हजार माशा मारण्यापेक्षा ही पद्धत केव्हाही चांगली. तळेगावदाभाडे येथील श्री. विजय महाजन ही सेवा पुरवतात. तळेगावात त्यासाठीचा खर्च आहे पाचशे रुपये. पुणे, पिपंरीचिचंवड परिसरासाठी एक हजार रुपये. ते या कामासाठी काही कार्यकर्त्यांनाही तयार करत आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील अमित गोडसे हा तरूणही मधमाशा जगाव्यात म्हणून प्रयत्न करतो आणि काही शुल्क आकारून पोळी काढून देतो. जागोजागी असे कार्यकर्ते तयार झाले, तर हकनाक मरणाऱ्या मधमाशा वाचवणं शक्य होईल… श्रीमहाजन यांचा संपर्काचा क्रमांक : ९२२६४५८८२०, श्री. गो़डसे याचा संपर्काचा क्रमांक- ९९२०६९८७७८)

अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार

फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

संपादक, भवताल मॅगझीन

http://www.abhijitghorpade.wordpress.com

जांभा सांगतोय, प्राचीन हवामानाचा इतिहास!

सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा पट्टा. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तिथं कोणे एके काळी कोकणासारखा धोधो पाऊस पडायचा. हा इतिहास उलगडलायतिथं सापडणाऱ्या जांभा नावाच्या खडकाने. तिथं हा जांभा खडक जागोजागी भेटतो आणि स्वत:च्या निर्मितीची कहाणीच सांगतो! तिथं इतका पाऊस पडायचा असं सांगितलं तरी आजच्या दुष्काळी स्थितीत दिलासा वाटावा

अभिजित घोरपडे

J5

सांगली जिल्ह्यात विटा-खानापूर रस्त्यावर असलेल्या तामखडी गावात सर्वत्र अशी लालेलाल माती आहे. कारण एकच- तिथं आढळणारा जांभा !

 

दंडोबा.. सांगलीजवळ असलेला हा एक डोंगर. प्रसिद्ध पर्यटनस्थळ! निसर्गप्रेमी, भाविक, तरुणतरुणी, ट्रेकिंग करणारे अशा साऱ्यांचं आवडतं ठिकाण. कोणी सहलीसाठी जातात, कोणी वृक्षारोपण करण्यासाठी, कोणी गुहेतील मंदिराच्या दर्शनासाठी, तर कोणी इतर कारणांसाठीयात्रा किंवा काही सणांचे दिवस सोडले तर फारशी वर्दळ नसते. त्यात या डोंगराचा पसारा बराच मोठा. त्यामुळे थोडीफार गर्दी असली तरी ती जाणवत नाही. वाहणारा वारा, निवांतपणा अनुभवण्यासाठीच हे एक उत्तम ठिकाण!

J4

दंडोबावर असलेलं मंदिर असं जांभा खडकामध्ये कोरलेल्या गुहेत आहे.

मी या डोंगराद्दल बरंच ऐकलं होतं. त्यातल्या एका वेगळ्या गोष्टीचं मला कुतूहल होतं. इतकं की प्रत्यक्ष जाऊन ते कधी पाहतो, असं झालं होतं. तीनचार वर्षांपूर्वी योग आला. आणि ते पाहून खरंच आश्चर्यचकित झालो. ऐकलं होतं, तरीही ते प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. असं काय होतं तिथं?.. तर वैशिष्ट्यपूर्ण खडक! तिथले खडक पाहिले की वाटावं, आपण कोकणात तर नाही ना! इतका वेगळा. कसला खडक?… तर लालपिवळ्या रंगाचा, झीज झालेला आणि पाणी वाहून जाईल असा सछिद्र. हा तर जांभाकोकणाची ओळख असलेला!

दंडोबा डोंगराच्या माथ्याचा संपूर्ण थर याच प्रकारच्या खडकाचा. तोच खडक कोरून गुहा केलेली आणि त्या गुहेत एक मंदिर. आजूबाजूला खडकाच्या भल्या मोठ्या शिळा पडलेल्या. त्या साऱ्या लालपिवळ्या रंगाच्या म्हणजेच जांभ्याच्या!

माझ्यासाठी ही नवलाई होती. कारण कोकण सोडून इथं जांभा कसा? तो सुद्धा सांगलीसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात! तसा यापूर्वी पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी तुरळक प्रमाणात जांभा पाहिला होता, पण हे इतके मोठाले खडक आणि संपूर्ण जांभ्याचा थर पहिल्यांदाच पाहात होतो. ते पाहून आश्चर्य वाटण्याचं कारण हे की जांभा खडक विशिष्ट हवामानातच निर्माण होतो. त्याच्यासाठी कोकणासारखी जास्त पावसाची आणि भरपूर आर्द्रता असलेली स्थिती आवश्यक असते. दंडोबा डोंगरावर हवामानाची स्थिती नेमकी याच्या विरुद्ध आहे. तिथला प्रदेश कमी पावसाचा आणि कोरड्या हवामानाचा. तरीही इथं जांभा आढळणं हे आगळं होतं. बरं, असंही नव्हतं की, इथं कोणी इतर ठिकाणाहून जांभा आणला असेल किंवा तो पाण्यासोबत वाहत आला असेल. तो तिथलाच होता, तिथंच तयार झालेला.

J2

घराच्या भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले… बेडग गावाजवळचं हे कच्चं घर

 

हे केवळ दंडोबा डोंगरापुरतं मर्यादित नव्हतं. या परिसरात, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा जांभा पाहायला मिळतो. नेमकेपणानं सांगायचं तर मिरज तालुक्यात बेडग हे गाव. तिथून जवळ असलेल्या रेल्वे मार्गालगत एक कच्चं घर दिसलं. छप्पर म्हणून पत्रा आणि भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले. एरवी कोकणात जांभ्याच्या चिरांची सुंदर घर पाहिली होती, पण जांभ्याचे दगड रचलेलं हे इथलं घर. या घराजवळून लाल माती काढून ती रेल्वेमार्गावर पसरलेली दिसली. तिथूनच हे दगडसुद्धा काढलेले होते.

एवढंच नाही, तर खानापूरविटा रस्त्यावर वेगळा प्रकार पाहायला मिळाला. या रस्त्यावर खानापूरपासून ६ किलोमीटर अंतरावर तामखडी नावाचं गाव आहे. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तांबडी माती दिसली. आजूबाजूच्या मातीपासून स्पष्ट फरक लक्षात यावा, इतकी तांबडी! शेतंच्या शेतं या तांबड्या मातीत. त्यातच नांगरट केलेली आणि त्यातच उभी पिकं. या तांबड्या मातीचं रहस्यसुद्धा तिथं सापडणाऱ्या लाल जांभा खडकात होतं. तामखडीमध्ये जांभा आढळतो, त्यानंच तिथल्या लाल मातीला जन्म दिला आहे. तामखडी सोडून आणखी पुढं गेलं की प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर आहे. हे मंदिरसुद्धा जांभा खडकावरच वसलं आहे. मंदिराच्या मागं गेलं की तिथं लालपिवळसर रंगाचं टेकाड याची माहिती देतं.

J6

रेवणसिद्ध मंदिराच्या परिसरातही लाल-पिवळा जांभा दर्शन देतो.

याची आणखी एक तऱ्हा जत तालुक्यात पाहायला मिळाली. जत म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वांत दुष्काळी तालुक्यांपैकी एक. कर्नाटकच्या सीमेवर. जतपासून कर्नाटकात अथनी या गावाला एक रस्ता जातो. या रस्त्याने जाताना उजव्या हाताला टेकडीवर मोठमोठाल्या पवनचक्क्या दिसल्या. ते पाहण्यासाठी थांबलो, तर संपूर्ण टेकडीच लालेलाल खडकाची दिसली. ती टेकडी जांभा खडकाची होती. तीच नव्हे तर आसपासच्या ओळीने साऱ्या टेकड्या जांभ्याच्याच होत्या. काही लाल रंगाच्या, तर काही लालबरोबरच पिवळसर झाक असलेल्या!

J3

जतकडून कर्नाटकात अथनीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना जांभ्याच्या टेकड्या दिसतात. त्यावरचा लालबुंद रस्ता कोकणची आठवण करून देतो.

याचा अर्थ हा जांभा याच भागातला मूळ निवासी. तो कुठून तरी आलेला / आणलेला किंवा पाण्यासोबत वाहत आलेला अजिबात नाही. हा सांगितलेला सारा भाग येतो दुष्काळी पट्ट्यातकाही माणदेशात, तर काही त्याला लागून असलेल्या भागात. हे वास्तव असेल तर ते मोठा प्रश्न उपस्थित करतं. कोकणच्या हवामानातला जांभा या दुष्काळी पट्ट्यात कसा?

सामान्यांना प्रश्न पडेल, पण अभ्यासक, विशेषत: पुराहवामानतज्ज्ञ / भूशास्त्राचे अभ्यासक याचं उत्तर देतात. ही मंडळी प्राचीन काळातील हवामानाचा अभ्यास करतात. त्यावरून त्या काळातील हवामान आणि त्यात झालेला बदल याची माहिती मिळवतात. पुण्यातील डॉ. शरद राजगुरू हे असेच वरिष्ठ तज्ज्ञ. त्यांच्यासोबतच मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात सासवडजवळ आढळणारे जांभ्याचे खडक पाहिले होते. या तज्ज्ञांचा निष्कर्ष असा, की सांगली जिल्ह्यात आढळणाऱ्या जांभ्याची निर्मिती काही हजार किंवा काही लाख वर्षांपूर्वी झाली आहे. तो तयार झाला तेव्हा तिथं कोकणासारखं हवामान होतं. म्हणजेचभरपूर पाऊस आणि आर्द्र हवा. तेसुद्धा थोड्याथोडक्या काळापुरतं नव्हे तर किमान काही हजार वर्षं!

आता सर्वच भाग अतिशय कमी पावसाचा. महाराष्ट्राचा दुष्काळी भाग म्हटलं की या भागाचं नाव आधी घेतलं जातं. त्यामुळे तिथं कधी काळी भरपूर पाऊस पडत होता हे सांगितलं तरी दिलासा मिळावाहवामान आणि त्याचं चक्र एकसारखं नसतं, ते सतत बदलत असतं. त्याची गती संथ असते इतकंच.

J1

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जागोजागी असे जांभ्याचे खडक  पाहायला मिळतात.

आताच या विषयावर लिहायचं कारण असं की सध्या दुष्काळी वर्ष आहे. पाण्याची ओरड आहे. ही परिस्थिती उद्भवण्यास कमी पडलेला पाऊस हे कारण आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण निसर्गातील व्यवस्था नष्ट केल्या आहेत. उदा. नैसर्गिक प्रवाह, भूजलाची व्यवस्था, त्याचं पुनर्भरण करण्यास उपयुक्त ठरणारा झाडोरा, वगैरे. निसर्गसुद्धा बदल घडवून आणतो, पावसाचं प्रमाण कमी करतो. म्हणून तर सांगलीत पूर्वीचा जांभा दिसतो, तर आता दुष्काळ! पण निसर्गातील बदल संथ गतीने होतात, तर आपली गाडी सुसाट सुटते. निसर्गाच्या वेगाशी जुळवून घेणं काही प्रमाणात शक्य असतं, पण आपल्या या वेगाचं काय?

याचं भान यावं यासाठी हे सारं!

अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार

फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

संपादक, भवताल मॅगझीन

http://www.abhijitghorpade.wordpress.com